IND vs ENG, 4th Test : ४० वर्षांनंतर घडला इतिहास, अक्षर पटेल-आर अश्विन यांच्यासह टीम इंडियानं नोंदवले भारी विक्रम

IND vs ENG, 4th Test : इंग्लंडच्या पहिल्या डावातील २०५ धावांच्या प्रत्युत्तरात भारतानं ३६५ धावा करून १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव आर अश्विन ( R Ashwin) आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी १३५ धावांवर गुंडाळला. अक्षर पटेलनं ४८ धावांत पाच विकेट घेतल्या, आर अश्विननंही ४७ धावांत पाच बळी टिपले. या कामगिरीसह पटेल व अश्विन यांच्यासह टीम इंडियानंही अनेक विक्रमांना गवसणी घातली. Axar Patel & R Ashwin registered many records in 4th Test

कारकिर्दीच्या पहिल्या तीन कसोटीत डावात पाच विकेट्स घेणारा अक्षर पटेल हा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. त्यानं पदार्पणाच्या कसोटी मालिकेत चारवेळा डावात ५+ विकेट्स घेतल्या. नरेंद्र हिरवाणी, शिवारामाकृष्णन, आर अश्विन व महोमद निसार यांना तीनवेळाच ५+ विकेट्स घेता आल्या आहेत.

अक्षर पटेलनं मालिकेत चार वेळा ५+ विकेट्स घेत टीएम अॅल्डर्मन ( १९८१) व आर्थूर मैली ( १९२०-२१) यांच्याशी बरोबरी केली. रॉडनी हॉज यांनी ( १९७८-७९) च्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत पाच वेळा ५+ विकेट्स घेतल्या होत्या.

कसोटी मालिकेत डावात सर्वाधिक चारवेळा ५+ विकेट्स घेणारा अक्षर पटेल पाचवा गोलंदाज ठरला. सुभाष गुप्ते ( वि. न्यूझीलंड, १९५५), भागवथ चंद्रशेखर ( वि. इंग्लंड, १९७२-७३), हरभजन सिंग ( वि. ऑस्ट्रेलिया, २००१) आणि आर अश्विन ( वि. ऑस्ट्रेलिया, २०१३) यांनी अशी कामगिरी केली आहे.

आर अश्विननं आजच्या सामन्यात ४७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. इंग्लंडविरुद्ध त्यानं कसोटीत सहाव्यांदा ५+ विकेट्स घेतल्या. यासह त्यानं न्यूझीलंडविरुद्धच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका ( प्रत्येकी ५ वेळा ५+ विकेट्स) यांच्याविरुद्ध अश्विननं जबरदस्त कामगिरी केली आहे.

एका कसोटी मालिकेत भारतीय फिरकीपटूंनी सर्वाधिक ६७ विकेट्स घेण्याची ही चौथी वेळ आहे. भारतीय फिरकीपटूंनी १९७२-७३च्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ७२ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर २०१६-१७च्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ६८ आणि १९७७-७८च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ६७ विकेट्स घेतल्या होत्या.

या कसोटी मालिकेत आर अश्विननं सर्वोत्तम कामगिरी केली. त्यानं एकूण ३२ विकेट्स घेतल्या. यापूर्वी त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१५-१६च्या घरच्या मैदानावरील मालिकेत ३१ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१२-१३च्या मालिकेत २९ विकेट्स घेतल्या होत्या.

अक्षर पटेलनं कसोटीत पदार्पण केल्यापासून सहा डावांमध्ये चार वेळा पाच + विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक २७ विकेट्स ( ३ सामने) घेत अक्षर पटेलनं अनेक दिग्गजांना मागे टाकले. दीलीप जोशी यांनी ६ सामन्यांत २७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर शिवलाल यादव ( २४ विकेट्स, ६ सामने), आर अश्विन ( २२ विकेट्स , ३ सामने) यांचा क्रमांक येतो.

आर अश्विननं ८व्यांदा मॅन ऑफ दी सीरिजचा मान पटकावला. मुथय्या मुरलीधरन ( ११) आणि जॅक कॅलिस ( ९) हे त्याच्यापेक्षा आघाडीवर आहेत. आर अश्विननं कसोटीत ३०वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेत जेम्स अँडरसनच्या विक्रमाशी बरोबरी केली.

विराट कोहलीनं घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून २३ वा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ ( २२) याचा विक्रम मोडला. ग्रॅमी स्मिथ ( ३०) व रिकी पाँटिंग ( २९) आघाडीवर आहेत.

कसोटीच्या एकाच डावात दोन गोलंदाजांनी पाच विकेट्स घेण्याची ही भारतासाठी सहावी वेळ आहे. ४० वर्षांनंतर असा पराक्रम झाला. लाला अमरनाथ/ वीनू मांकड ( वि. इंग्लंड, १९४६), एस गुप्ते/वीनू मांकड ( वि. वेस्ट इंडिज, १९५३), बिशन सिंग बेदी/ ई प्रसन्ना ( वि. ऑस्ट्रेलिया, १९६९), कपिल देव/कर्सन घावरी ( वि. ऑस्ट्रेलिया, १९८१) आणि कपिल देव/मदनलाल ( वि. इंग्लंड, १९८१) यांनी अशी कामगिरी केली.

आर अश्विननं सहा प्रमुख संघांविरुद्ध मालिकावीर हा पुरस्कार पटकावला. वेस्ट इंडिज ( २०११ व २०१६), न्यूझीलंड ( २०१२ व २०१६), ऑस्ट्रेलिया ( २०१३), श्रीलंका ( २०१५), दक्षिण आफ्रिका ( २०१५) व इंग्लंड ( २०२१) यांच्याविरुद्ध त्यानं मॅन ऑफ दी सीरिज पुरस्कार जिंकला.