विराट कोहलीसह टीम इंडियाचे तीन शिलेदार एका फॉरमॅटमधून होणार निवृत्त!

ट्वेंटी-20 फॉरमॅटनंतर क्रिकेटच्या सामन्यांचे प्रमाण सातत्यानं वाढत गेले. त्यामुळे दोन मालिकांमधील विश्रांतीचा कालावधीही कमी होत गेला आणि त्याचा परिणाम खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर जाणवू लागला.

ट्वेंटी-20 फॉरमॅटनंतर क्रिकेटच्या सामन्यांचे प्रमाण सातत्यानं वाढत गेले. त्यामुळे दोन मालिकांमधील विश्रांतीचा कालावधीही कमी होत गेला आणि त्याचा परिणाम खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर जाणवू लागला.

त्यामुळेच काही वर्षांपासून वर्कलोड मॅनेजमेंट ही संकल्पना अस्तित्वात आली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम व्यवस्थापनाचाही या संकल्पनेवर अधिक भर असल्याचे पाहायला मिळत आहे.

खेळाडूंनी तंदुरुस्त व ताजेतवाने राहण्यासाठी त्यांच्यावर असणाऱ्या कामाचा ताण योग्य रितीने हाताळण्याची जबाबदारी या वर्कलोड मॅनेजमेंटवर आहे. त्याचाच भाग म्हणून वन डे वर्ल्ड कप 2019पूर्वी कर्णधार कोहलीनं काही सामन्यांतून विश्रांती घेतली होती.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी कोहलीनं वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल भाष्य केले होते आणि दीर्घकाळ क्रिकेट खेळण्यासाठी एका फॉरमॅटमधून निवृत्तीचे संकेतही दिले होते.

केवळ कोहलीच नाही येत्या काही महिन्यांत किंवा वर्षांत टीम इंडियाचे तीन प्रमुख शिलेदार क्रिकेटच्या एका फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करू शकतात. तसे न केल्यास ते दीर्घकाळ क्रिकेट खेळू शकत नाहीत.

हिटमॅन रोहित शर्मा हा सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. टीम इंडियाचा हा प्रमुख सदस्य सातत्यानं क्रिकेट खेळत आहे. त्यानं या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून विश्रांती घेतली होती. त्यानंतर तो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मालिकेत खेळला.

ट्वेंटी-20 मालिकेत त्याला दुखापत झाली आणि त्यानं वन डे मालिकेतून माघार घेतली. कोहलीसह तो क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सातत्यानं खेळत आहे. रोहित सध्या 32 वर्षांचा आहे आणि 2023च्या वर्ल्ड कपपर्यंत त्याचं वय 36 होईल.

टीम इंडियाला आणखी एका वन डे वर्ल्ड कपसाठी तरी रोहितची आवश्यकता आहे. त्यामुळे 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपनंतर रोहित ट्वेंटी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो.

हार्दिक पांड्या दुखापतीनं त्रस्त आहे आणि तो सध्या तंदुरुस्तीसाठी कसून मेहनत घेत आहे. सप्टेंबर 2018पासून तो कसोटी क्रिकेटपासून दूरच आहे आणि कसोटीत तो लवकर पुनरागमन करेल, याची शक्यताही फार कमी आहे. कसोटीत टीम इंडियाला त्याची फार आवश्यकताही नाही.

त्यामुळे पांड्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी फिट बसणारा खेळाडू आहे. पुढील दहा वर्ष क्रिकेट खेळायचे असल्यास त्याला कसोटीतून निवृत्ती घ्यावी लागेल.

जसप्रीत बुमराह मागील दोन वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळत आहे, परंतु त्याला घरच्या मैदानावर अजून कसोटी खेळण्याची संधी मिळालेली नाही. संघ व्यवस्थापनाला त्याची स्ट्राँग बाजू माहीत आहे आणि त्यामुळे परदेशात त्याची गरज जास्त आहे.

त्याचे महत्त्व सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळेच तो काही काळ मर्यादित षटकांच्या सामन्यांपासून दूर राहिला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो केवळ आठ ( पाच ट्वेंटी-20 आणि तीन वन डे) मर्यादित षटकांचे सामने खेळला आहे. कसोटी सामन्यांत त्याची संघाला अधिक गरज आहे आणि त्यामुळेच 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप नंतर तो मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतो.