पुढल्या वेळी संजू १० यार्डनं मोठा सिक्सर ठोकेल; 'त्या' वादात संगकारा संजूच्या ठामपणे पाठिशी

IPL 2021 : RR vs PBKS T20, Sanju Samson: राजस्थान रॉयल्सचा नवनिर्वाचीत कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) यानं सोमवारी अविस्मरणीय खेळी केली. Sanju Samson scored 119 runs from just 63 balls including 12 fours and 7 sixes, break many records

राजस्थान रॉयल्सचा नवोदित कर्णधार संजू सॅमसननं आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात कमाल केली. राजस्थाननं सामना गमावला असला तरी संजूच्या वादळी शतकानं सर्वांचे डोळे भरुन आले.

पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) २२१ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) सलामीवीर बेन स्टोक्स भोपळ्यावर माघारी परतला. त्यानंतर टप्प्याटप्यानं विकेट्स पडतच होत्या. पण, कर्णधार सॅमसन एक बाजूनं खिंड लढवत होता. त्यानं जोस बटलर व शिवम दुबे यांना सोबत घेऊन, RRसाठी मजबूत पाया तयार केला.

संजू सॅमसननं खणखणीत शतक ठोकलं. पण अखेरच्या षटकात २ चेंडूत राजस्थानला पाच धावांची गरज होती. पुढच्या चेंडूवर संजूनं फटका लगावला पण त्यासाठी केवळ एक धाव घेता येणार होती. संजूचा सहकारी फलंदाज ख्रिस मॉरिसनं धाव घेतली देखील. पण संजूनं नकार दिला.

संजू सॅमसननं ख्रिस मॉरिसला माघारी पाठवलं आणि सामना एका चेंडूत ५ धावा असा आला. अखेरच्या चेंडूवर संजूनं जोरदार फटका लगावला खरा पण सीमारेषेजवळ तो झेलबाद झाला आणि रॉयल्सनं सामना गमावला.

संजूनं एक धाव घेण्यास दिलेल्या नकारावरुन आता वाद सुरू झाला आहे. ख्रिस मॉरिससारखा यंदाच्या आयपीएलमधला सगळ्यात महागडा खेळाडू समोर असतानाही संजूनं एक धाव का घेतली नाही? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

पण राजस्थान रॉयल्सचा संचालक कुमार संगाकारानं टीकाकारांना जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. "पुढल्यावेळी संजू नक्कीच चेंडूला १० यार्डनं आणखी दूर पोहोचवेल", असं ठामपणे सांगत संजूची पाठराखण केली आहे.

"संजूनं स्वत:वर विश्वास ठेवला आणि आपणच सामना संपवण्याचा निर्णय घेतला. सीमारेषेच्या अवघ्या पाच किंवा सहा यार्डनं चेंडू आत राहिला. जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये असता तेव्हा तुम्हालाही वाटतं की होय आपण हे करू शकतो. संजूनंही एक कर्णधार म्हणून तेच केलं. पुढल्या वेळी संजू सीमारेषेच्याही १० यार्ड दूर चेंडू टोलवेल आणि संघाला विजय प्राप्त करुन देईल", असा विश्वास संगकारानं व्यक्त केला.

सामना सुरू असताना समालोचन कक्षातही समालोचक सुनील गावस्कर यांनीही संजूच्या एक धाव न घेण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. ख्रिस मॉरिसनं ४ चेंडूत केवळ दोन धावा केल्या होत्या. त्यामुळे संजूनं स्वत: जबाबदारी पार पाडणं योग्य समजलं, असं गावस्कर म्हणाले.

संजूनं सामन्यात शतक ठोकलं खरं पण आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना शतक व्यर्थ जाण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी युसूफ पठाणनं २०१०मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ३७ चेंडूंत ८ षटकार व ९ चौकारासह १०० धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे राजस्थान रॉयल्सनं तोही सामना चार धावांनी गमावला होता.

आयपीएलमध्ये सर्वाधिक ६ शतकांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानंतर विराट कोहली ( ५), शेन वॉटसन व डेव्हिड वॉर्नर ( प्रत्येकी ४) आणि एबी डिव्हिलियर्स व संजू सॅमसन ( प्रत्येकी ३) यांचा क्रमांक येतो.