भारताने न्यूझीलंडवर कसा मिळवला विजय; पाहा फक्त एका क्लिकवर

भारतीय संघ आज चार फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरला होता आणि ही रणनीती उपयोगी ठरली. न्यूझीलंडच्या अॅमेली केरनं अखेरच्या दोन षटकांत तुफान फटकेबाजी करून सामन्यात चुरस निर्माण केली होती. भारतानं या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

पुन्हा एकदा शेफाली वर्मा टीम इंडियासाठी तारणहार ठरली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शेफालीनं 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, परंतु अन्य फलंदाजांनी अपयशाचा कित्ता गिरवला. या सामन्यात स्मृती मानधनाचे पुनरागमन झाले. तापामुळे तिला दुसऱ्या लढतीत मुकावे लागले होते.

स्मृतीनं चौकार खेचून धावांचे खाते उघडले खरे, परंतु तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ली ताहूहूच्या गोलंदाजीवर ती त्रिफळाचीत झाली. तिने केवळ 11 धावा केल्या.

शेफालीनं आपली फटकेबाजी सुरू ठेवताना किवी गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. तिनं अॅना पीटरसनच्या एका षटकात सलग दोन खणखणीत षटकार खेचून संघाला अर्धशतकी धावांकडे कूच करून दिली.

10व्या षटकात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. अॅमेलिया केरनं पहिल्याच चेंडूवर तानिया भाटीयाला बाद केले. तानिया आणि शेफाली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. तानियानं 23 धावा केल्या.

12व्या षटकात रोझमेरी मेयरनं टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. तिनं जेमिमा रॉड्रीग्जला बाद केले. जेमिमाला 10 धावाच करता आल्या.

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीनं अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राखला. अवघी एक धाव करून ती माघारी परतली. 14व्या षटकात न्यूझीलंडला मोठं यश मिळालं. त्यांनी टीम इंडियाच्या शेफाली वर्माला बाद केले.

शेफालीनं 34 चेंडूंत 46 धावा केल्या. त्यात 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. भारताला 8 बाद 133 धावांवर समाधान मानावे लागले.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 34 धावांत 3 धक्के बसले. शिखा पांडे, दीप्ती शर्मा आणि पूनम यादव यांनी पहिल्या दहा षटकांत किवींना हे धक्के दिले. कॅटी मार्टीन आणि मॅडी ग्रीन यांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडचा डाव सावरला. पण, राजेश्वरी गायकवाडने ही जोडी तोडली. तिनं ग्रीनला ( 24) बाद केले.

राधा यादवनं मार्टीनला बाद करून भारताला मोठं यश मिळवून दिलं. मार्टीननं 25 धावा केल्या. क्षेत्ररक्षकांनीही गोलंदाजांना साजेशी साथ दिली. अॅमेली केरनं 19व्या षटकात पूनम यादवच्या गोलंदाजीवर 18 धावा चोपून काढल्या.

या सामन्यात शेफालीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. शेफालीने सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे.