"रिषभ पंत हिंदू, शुभमन गिल शीख, मोहम्मद सिराज मुस्लिम;हे सर्व एकत्र आले अन् भारत जिंकला"

गाबाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने ३२ वर्षांत पराभव बघितलेला नाही. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये सलग २८ कसोटी सामने सहज जिंकले, अशा प्रकारच्या फुशारक्या मारणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय युवा ब्रिगेडने जबरदस्त हादरा दिला आणि कांगारूंना चारीमुंड्या चीत केले. अनुभवी आणि दिग्गज खेळाडू जखमी असताना नवख्या चहेऱ्यांनी जिद्दी खेळ करीत ऑस्ट्रेलियाचे ‘गर्वाचे घर खाली’ केले.

क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते हे देखील जखमी भारतीय वाघांनी चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी खरे करून दाखविले. ३२८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ गड्यांनी दणदणीत पराभव केला. कसोटी मालिकाही २-१ अशा फरकाने खिशात घातली.

टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इतिहास रचला. प्रमुख खेळाडू जायबंदी होत असताना अजिंक्यनं मोठ्या कौशल्यानं सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीनं कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला. शुबमन गिल ( Shubman Gill), रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियानं ठेवलेले ३२८ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ३ विकेट्स राखून पार केले.

शुबमन गिलने १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावा करून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. ऑसी गोलंदाजांचा मारा शरिरावर झेलूनही चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर नांगर रोवून उभा राहिला. कर्णधार अजिंक्य रहाणेनं आक्रमक खेळी करताना टीम इंडियाच्या विजयासाठी प्रयत्न केले, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही.

रहाणे २२ चेंडूंत २४ धावांत माघारी परतला. रिषभ पंतला बढती देण्यात आली, पण त्यानेही दमदार खेळी केली. पुजारानं चौथ्या विकेटसाठी पंतसह अर्धशतकी भागीदारी केली. नवीन चेंडू घेतल्यानंतर पॅट कमिन्सनं पहिल्याच षटकात पुजाराची विकेट घेतली. अम्पायर कॉलमुळे पुजाराला २११ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीनं ५६ धावांवर माघारी जावे लागले. त्यानंतर रिषभनं आक्रमक खेळ केला. त्यानं अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाच्या विजयासाठीचे प्रयत्न केले.

पाचव्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी १५ षटकांचा खेळ शिल्लक करताना टीम इंडिया बाजी मारेल असा विश्वास वाटत होता. पण, मयांक अग्रवालच्या विकेटनं ऑस्ट्रेलियन संघाला बूस्ट मिळवून दिला. मयांक ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रिषभ व वॉशिंग्टन सुंदर यांनी खिंड लढवत सामना जिंकला. या जोडीनं सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. रिषभ पंत १३८ चेंडूंत ८९ धावांवर नाबाद राहिला. भारतानं ही मालिका २-१अशी जिंकून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे कायम राखली.

भारताच्या या विजयानंतर काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एकसंध भारताच्या संस्कृतीमुळे हा विजय आल्याचं सांगताना अनोख उदाहरण दिलं आहे.

‘रिषभ पंत हिंदू आहे त्याने ८९ धावा बनवल्या, शुभमन गिल शीख आहे त्याने ९१ रन बनवल्या, मोहम्मद सिराज मुस्लिम आहे त्याने ५ विकेट घेतल्या आणि भारत जिंकला. आपण पहिल्यापासूनच म्हणतो की, ‘हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई एक झाले तर भारताला कोणीही हरवू शकत नाही. परस्पर द्वेषाने भारत कमकुवत आहे, परंतु बंधुता भारताला मजबूत बनवते.’असा संदेश देखील हार्दिक पटेल यांनी दिला आहे.