ऑस्ट्रेलियाहून येताच वॉशिंग्टन सुंदरने शेअर केला त्याच्याकडील अनमोल ठेवा, पाहून तुम्ही म्हणाल....

Washington Sundar : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने मायदेशी परतताच त्याच्याकडील अनमोल ठेवा सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला आहे. या विजेत्या संघावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने मायदेशी परतताच त्याच्याकडील अनमोल ठेवा सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कसोटी क्रिकेट खेळणारा तो भारताचा ३०१ वा क्रिकेटपटू ठरला आहे.

आता भारतात परतताच वॉशिंग्टन सुंदरने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर त्याच्या वडिलांसोबत उभा आहे. तसेच त्याचे वडील वॉशिंग्टन सुंदरची ३०१ क्रमांकाची टेस्ट कॅप दाखवत आहेत.

हा फोटो शेअर करताना वॉशिंग्टन सुंदरने माझी अनमोल संपत्ती, असा उल्लेख केला आहे. ब्रिस्बेन कसोटीत पदार्पणातच वॉशिंग्टन सुंदरने पहिल्या डावात ६२ आणि दुसऱ्या डावात २२ धावांची खेळी केली होती. तसेच सामन्यात त्याने चार बळीही टिपले होते.

वॉशिंग्टन सुंदरने पहिल्या डावात शार्दुल ठाकूरसोबत आणि दुसऱ्या डावात रिषभ पंतसोबत केलेली भागिदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरली होती.

दरम्यान, सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यश मिळवले होते. या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा तब्बल ३२ वर्षांनंतर पराभव झाला होता.