Happy Birthday : तेंडुलकरला शून्यावर बाद करणारा एकमेव गोलंदाज, भुवनेश्वर कुमार !

भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आज 29 वर्षांचा झाला. भुवनेश्वर कुमार सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर प्रतिस्पर्धी संघाला आपल्या स्विंग गोलंदाजीने हैराण करत आहे. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया...

भुवनेश्वरचा जन्म 5 फेब्रुवारी 1990 मध्ये उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झाला. भुवनेश्वरचे वडील किरण पाल सिंह हे उत्तर प्रदेश पोलिसात सब-इंस्पेक्टर आहेत आणि आई इंद्रेश गृहिणी आहे. भुवीला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड होते.

मोठी बहीण रेखाने भुवीला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरीच मदत केली. तिनेच भुवीचा क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश करून दिला. वयाच्या 13 व्या वर्षी भुवी 7-8 किलोमीटर सरावासाठी जायचा. सुरुवातीला बहीण त्याला सोडायला व आणायला जायची. रेखाची भूमिका येथेच संपत नाही, तर ती भुवीची मेंटर बनली. तिने भुवीच्या शाळेत विनंती करताना त्याला खेळण्यासाठी परवानगी मागितली.

स्थानिक क्रिकेटमध्ये भुवीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद केले, तेव्हा तो प्रथम चर्चेत आला. 17 वर्षाच्या वयात भुवीने पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. 2009 मध्ये रणजी करंडक स्पर्धेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करताना त्याने तेंडुलकरला शून्यावर बाद केले.

भुवीने 30 डिसेंबर 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतीय वन डे संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तान फलंदाजांना चांगलेच सतावले. त्याने पहिल्याच सामन्यात 3 निर्धाव षटकं टाकताना दोन विकेट घेतल्या.

पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा विक्रम भुवीने आपल्या नावावर केला. त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद हाफीजला पहिल्याच चेंडूवर बाद केले आणि असा विक्रम करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला.

भुवनेश्वर कुमारने 103 वन डे सामन्यात 114 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय 21 कसोटीत 63 आणि 34 ट्वेंटी-20 सामन्यांत 33 विकेट घेतल्या आहेत. वन डेतील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ही 42 धावांत 5 विकेट ही आहे. कसोटीत त्याने 86 धावांत 6 आणि ट्वेंटी-20त 24 धावांत 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

भुवीने 23 नोव्हेंबर 2017 मध्ये मेरठ येथे राहणाऱ्या नूपुर नारंगशी लग्न केले. नूपुर इंजिनीयर आहे.