पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमचे ट्वेंटी-20त शतक; विराट-रोहितलाही टाकलं मागे

पाकिस्तानी वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam) ने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ट्वेंटी-20 ब्लास्ट ( T20 Blast) स्पर्धेत बुधवारी शतकी खेळी केली.

समरसेट ( Somerset ) क्लबचे प्रतिनिधित्व करताना बाबर आझमने 62 चेंडूंत नाबाद 114 धावांची खेळी केली. त्यात त्यानं 9 चौकार व 5 षटकार लगावले.

बाबरने या खेळीसह एका विक्रमाला गवसणी घातली आणि विराट कोहली व रोहित शर्मा या तगड्या प्रतिस्पर्धींनाही मागे टाकले.

बाबर आझमने ग्लॅमॉर्गन संघाविरुद्ध खेळताना ही धडाकेबाज खेळी केली. सलामाली आलेला बाबर अखेरच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर टीकून राहिला. बाबरची ही ट्वेंटी-20तील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.

बाबरने 183च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करून समरसेट क्लबला 8 बाद 192 धावांपर्यंत मजल मारून दिली, परंतु संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

पण, बाबरनं त्याच्या खेळीच्या जोरावर एका विक्रमाला गवसणी घातली. त्यानं ट्वेंटी-20 क्रिकेटचा 5000 धावांचा पल्ला पार केला.

ट्वेंटी-20त सर्वात जलद 5000 धावा करणारा तो जगातला तिसरा आणि आशियातला पहिला खेळाडू ठरला. त्यानं 145 डावांमध्ये हा पराक्रम केला.

ख्रिस गेल ( 132 डाव) आणि शॉन मार्श ( 144 डाव) हे या विक्रमात अव्वल दोन स्थानावर आहेत. विराट कोहलीला 167 डाव खेळावे लागले.