IPL ला जुगार अन् अश्लील म्हणालेले बाबा रामदेव; आता टायटल स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी त्यांची कंपनी प्रयत्नशील

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सर VIVOनं यंदा माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोज नवनवीन नावं समोर येत आहेत.

Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022 आणि 2023ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत.

VIVOच्या या निर्णयामुळे बीसीसीआयला 440 कोटींवर पाणी सोडावे लागले आहे. पण, याचा फायदा बाबा रामदेव यांच्या पतंजलीला होण्याची शक्यता आहे.

पतंजलीनं आयपीएल टायटल स्पॉन्सरशीपसाठी बोली लावण्याची उत्सुकता दर्शवली आहे आणि त्यांना ही डिल स्वस्तात मिळू शकते.

Vivo India ने 2018मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात.

Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022 आणि 2023ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत.

''यंदाच्या आयपीएलसाठी टायटल स्पॉन्सरशीप मिळवण्याचा आम्ही विचार करत आहोत. पतंजलीला जागतिक बाजारात ओळख मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे,''असे पतंजलीचे प्रवक्ता एस के तिजरवाल यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले. बीसीसीआयकडे ते लवकरच प्रस्तावही पाठवणार आहेत.

आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपसाठी बीसीसीआयने एक नवीन अट ठेवली आहे. ज्या कंपनीचा टर्नओव्हर हा 300 कोटींपेक्षा जास्त असेल त्याच कंपनीला आता आयपीएलच्या प्रायोजकत्वाच्या शर्यतीत कायम राहता येणार आहे. पतंजली या नियमाची पूर्तता करतानाचे चित्र आहे.

पण, आयपीएल टायटल स्पॉन्सरशीपसाठी प्रयत्नशील असलेल्या बाबा रामदेव यांनी यापूर्वी आयपीएलवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "चीअरलीडर्समुळे क्रिकेट हा खेळ अश्लील झाला आहे. हे भारताच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. आयपीएल हा एक मोठा जुगार आहे, त्याचबरोबर आयपीएलमुळे सट्टेबाजी वाढत असल्याचेही पाहायला मिळत आहे.''