अरेरे... चेंडू आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पोहोचला थेट पार्किंगमध्ये, Video

इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील परभवानंतर ऑस्ट्रेलियनं संघानं वन डे मालिकेत चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियानं पहिल्या वन डे सामन्यांत 19 धावांनी विजय मिळवताना तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

इंग्लंडच्या सॅम बिलिंगनं 110 चेंडूंत 118 धावा करताना विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण, त्याच्या शतकावर पाणी फेरले गेले.

ऑस्ट्रेलियानं पहिल्या सामन्यात दमदार कमबॅक केलं. 23.4 षटकांत 5 बाद 123 धावा अशी अवस्था असूनही ऑस्ट्रेलियानं यजमान इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करताना मोठी मजल मारली.

मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं समाधानकारक पल्ला गाठला.

इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी सहाव्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली, मार्शनं 100 चेंडूंत 6 चौकारांसह 73 धावा केल्या, तर मॅक्सवेलनं 59 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार ठोकून 77धावा चोपल्या. त्यांच्या या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 9 बाद 294 धावांपर्यंत मजल मारली.

लक्ष्याचा पाठलाग करताना जेसन रॉय ( 3) चौथ्या षटकात माघारी परतला. जोश हेझलवूडनं स्वतःच्याच गोलंदाजीवर सुरेख झेल टीपला. त्यानंतर जो रूट ( 1), कर्णधार इयॉन मॉर्गन ( 23) आणि जोस बटलर ( 1) हे स्वस्तात बाद झाले.

जॉनी बेअरस्टो आणि बिलिंग यांनी सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पण, 36व्या षटकात अॅडम झम्पाने इंग्लंडला धक्का दिला. जॉनी बेअरस्टो 84 धावा ( 4 चौकार व 4 षटकार) करून माघारी परतला.

त्यानंतर बिलिंग वगळता इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी निराश केलं. बिलिंग 110 चेंडूंत 14 चौकार व 2 षटकार खेचून 118 धावा करून बाद झाला. इंग्लंडला 9 बाद 275 धावा करता आल्या.

या सामन्यात बिलिंगने टोलावलेला चेंडू स्टेडियम बाहेर गेला आणि तो आणण्यासाठी ऑसीच्या खेळाडूंना पार्किंगमध्ये जावं लागलं..

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना रविवारी होणार आहे.