Ashes 2019 : स्टीव्ह स्मिथची सुनील गावस्करांच्या 48 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

यजमान इंग्लंडने पाचव्या कसोटी सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाविरुद्धची अ‍ॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने रविवारी अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 135 धावांनी पराभव केला. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 399 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांत संपुष्टात आला. पण, ही मालिका गाजवली ती ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथनं...

अ‍ॅशेस मालिकेत स्मिथनं सलग 6 अर्धशतकं झळकावली आणि सलग 10 अर्धशतकांचा विक्रमही नावावर केला. एकाच संघाविरुद्ध दहावेळा सलग 50+ धावा करणारा स्मिथ हा जगातील पहिलाच फलंदाज ठरला. त्याने या विक्रमात पाकिस्तानचा माजी फलंदाज इंझमाम उल हकला मागे टाकले. इंझमामने इंग्लंडविरुद्ध सलग 9 अर्धशतकी खेळी केल्या होत्या.

स्मिथनं सात डावांत 6 अर्धशतक झळकावले आणि या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारा खेळाडू बनला. त्याने सलग सहा अर्धशतकं झळकावताना दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक ( 5) याचा विक्रम मोडला.

या मालिकेत स्मिथनं 774 धावा चोपल्या. 1994नंतर कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारानं 1994 च्या एका मालिकेत 778 धावा केल्या होत्या.

774 धावांसह अॅशेस मालिकेत सर्वाधिक धावा करणारो तो पाचवा फलंदाज ठरला आहे. 1989नंतर अॅशेस मालिकेत केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. या विक्रमात सर डॉन ब्रॅडमन ( 974 धावा , 1930), वॅली हेमड ( 905 धावा, 1923-29), मार्क टेलर ( 839 धावा, 1989 ) आणि डॉन ब्रॅडमन ( 810 धावा 1936-37) हे आघाडीवर आहेत.

एका कसोटी मालिकेत 700 पेक्षा अधिक धावा अधिक वेळा करणाऱ्या फलंदाजांमध्ये स्मिथनं आपले नाव नोंदवले आहे. डॉन ब्रॅडमन, सुनील गावस्कर, ब्रायन लारा, एव्हर्टन वीक आणि गॅरी सोबर्स यांनी अशी कामगिरी केली आहे.

इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम स्मिथच्या नावे झाला आहे. हा विक्रम पूर्वी आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथच्या नावे होता. त्यानं 2003मध्ये इंग्लंडविुद्ध 714 धावा केल्या होत्या.

स्मिथने 774 धावांसह भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या 1970-71च्या विंडीजविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 774 धावांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे गावस्कर यांनी विंडीजविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत केवळ चार सामने खेळले. त्यांना पहिल्या कसोटीत संघात स्थान मिळाले नव्हते.