धोक्याची घंटा; यापूर्वी तीनदा मलिंगा IPLला मुकला, पाहा काय झाली होती मुंबई इंडियन्सची अवस्था!

मुंबई इंडियन्सला मंगळवारी मोठा धक्का बसला. आयपीएल जेतेपद कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्सनं कसून सरावालाही सुरुवात केली असाताना त्यांचं टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा यंदाची आयपीएल खेळणार नाही. मुंबई इंडियन्सनं त्याच्या बदली खेळाडूचं नाव मंगळवारी जाहीर केलं.

मलिंगानं यापूर्वी आयपीएलच्या तीन मोसमातून माघार घेतली आहे आणि यापूर्वीचा इतिहास पाहता त्याची माघार मुंबई इंडियन्ससाठी धोक्याची घंटा आहे.

श्रीलंकेचा 36 वर्षीय गोलंदाज वैयक्तिक कारणास्तव यूएईत दाखल होऊ शकणार नाही. मलिंगाचे वडील आजारी आहेत आणि त्यांच्यावर येत्या काही दिवसांत सर्जरी होणार आहे. त्यामुळे तो वडिलांसोबतच राहणार आहे.

मुंबई इंडियन्सन त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेम्स पॅटीन्सन याची निवड केली आहे.

मलिंगानं आयपीएलमध्ये 122 सामन्यांत 170 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स त्याच्याच नावावर आहे. त्यानं 19.80च्या सरासरीनं आणि 7.14च्या इकोनॉमीनं ही कामगिरी केली आहे. 2019चे जेतेपद जिंकून देण्यात मलिंगानं महत्त्वाचा वाटा उचलला होता.

2008पासून मलिंगा मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. आयपीएलच्या चौथ्या मोसमात मलिंगानं पर्पल कॅप पटकावली होती. त्यानं 16 सामन्यांत 28 धावा घेतल्या होत्या.

2018च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सनं मलिंगाला आपल्या ताफ्यात घेतलं नाही. पण, त्याची गोलंदाज मार्गदर्शक म्हणून संघानं निवड केली. 2019साठीच्या लिलावात मुंबई इंडियन्सनं त्याला पुन्हा संघात घेतलं. पण, पहिले सहा सामने तो खेळू शकला नाही.

मलिंगाची माघार रोहित शर्माची डोकेदुखी वाढवणारी... मलिंगा यापूर्वी 2008, 2016 आणि 2018मध्ये आयपीएलमध्ये खेळला नाही. या तीनही सीजमध्ये मुंबई इंडियन्सला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

मुंबई इंडियन्सनं 2013, 2015, 2017 आणि 2019मध्ये जेतेपद पटकावलं आहे.

Read in English