99 Not Out; तरीही गेलचं विक्रमी शतक, तेंडुलकरशी बरोबरी

किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्रमुख फलंदाज ख्रिस गेलने शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दमदार फलंदाजी केली. गेलने 64 चेंडूंत 10 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 99 धावा कुटल्या.

त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत 4 बाद 173 धावा केल्या, परंतु विराट कोहली ( 67) आणि एबी डिव्हिलियर्स ( 59) यांनी बंगळुरूला 8 विकेट राखून विजय मिळवून दिला.

ख्रिस गेलला आयपीएलमधील सातव्या शतकापासून एका धावेने वंचित रहावे लागले. मात्र, तरीही त्याने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये विशेष पराक्रम केला.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये शंभरवेळा 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रम गेलने केला. विक्रमाचे हे शतक ठोकणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. ट्वेंटी-20त त्याच्या नावावर 21 शतकं आणि 79 अर्धशतकं आहेत. सचिन तेंडुलकरने वन डे व कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम हा मान पटकावला होता.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ख्रिस गेल ( 12640) अव्वल स्थानावर आहे. त्याने 370 डावांत 38.94च्या सरासरीने या धावा चोपल्या आहेत.

त्याच्या नाबाद 99 धावांच्या खेळीने चेन्नई सुपर किंग्सच्या सुरेश रैनाच्या आगळ्यावेगळ्या विक्रमाशीही बरोबरी केली. आयपीएलमध्ये 99 धावांवर नाबाद राहणारा तो रैनानंतर दुसरा खेळाडू ठरला आहे.

रैनाला 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 99 धावांवर नाबाद रहावे लागले होते. याशिवाय एका धावेने शकतापासून वंचित राहणारा तो चौथा फलंदाज ठरला.

रैना आणि गेल यांच्याशिवाय विराट कोहली ( वि. दिल्ली कॅपिटल्स, 2013) आणि पृथ्वी शॉ ( वि. कोलकाता नाईट रायडर्स, 2019) हे 99 धावांवर बाद झाले होते.