राष्ट्रीय बोर्डाच्या पगारापेक्षा IPLमध्ये दुप्पट-तिप्पट कमावतात खेळाडू; जाणून घ्या फरक!

इंडियन प्रीमिअर लीग २०२१चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कोरोना व्हायरसमुळे मार्चमध्ये ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती आणि आता उर्वरित सामने यूएईत खेळवण्यात येतील. त्यामुळे अनेक देशांनी त्यांचे आंतरराष्ट्रीय दौरे स्थगित केलेत किंवा आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना दौऱ्यासाठी निवडलेल्या संघातून वगळले आहे. आयपीएलसाठी हे आंतरराष्ट्रीय खेळाडू अन् त्यांची क्रिकेट मंडळं असा निर्णय का घेतात, याचे उत्तर खेळाडूंना होणाऱ्या आर्थिक फायद्यातून कळतो...

वेस्ट इंडिज संघाचा स्फोटक फलंदाज शिमरोन हेटमायर हा विंडीजच्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार आहे. वेस्ट इंडिजच्या मर्यादित षटकांच्या संघातील तो एक प्रमुख खेळाडू बनला आहे. पण, विंडीज बोर्डाकडून त्याला १.७३ कोटी पगार मिळतो. सध्या तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो आणि त्यासाठी त्याला ७.७५ कोटी रुपये मिळतात. ( Shimron Hetmyer: ₹7.75 crores in IPL, ₹1.73 crores by WI board)

महेंद्रसिंग धोनीनंतर टीम इंडियाच्या यष्टिरक्षक-फलंदाज असे आपले स्थान मजबूत करणाऱ्या रिषभ पंतची फलंदाजी ही मंत्रमुग्ध करणारी ठरतेय. मर्यादित षटकांच्या सामन्यांतच नव्हे, तर कसोटीतही त्याचा तोच आक्रमक अंदाज दिसतो. बीसीसीआयकडून त्याला वर्षाला पाच कोटी पगार मिळतो, परंतु दिल्ली कॅपिटल्स या खेळाडूसाठी ८ कोटी मिळतात ( Rishabh Pant: INR 8 crores in IPL, INR 5 crores by BCCI)

अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान याचा जगभरातील ट्वेंटी-२० लीगमध्ये दबदबा आहे. २०१५ सालानंतर ट्वेंटी-२० राशिद हे खूप मोठे नाव झाले आहे. पण, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून त्याला मिळणारे मानधन अन् आयपीएलमधून तो कमावणारी रक्कम यात जमीनआसमानचा फरक आहे. अफगाणिस्तान बोर्ड त्याला वर्षाला ७२.८२ लाख देतात, तर सनराझर्स हैदराबादचा हा खेळाडू आयपीएलमधून ९.७ कोटी कमावतो ( Rashid Khan: INR 72.82 lakh per year by the Afghan cricket board, INR 9.7 crores in IPL)

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा मर्यादित षटकांच्या सामन्यात जगातील सर्वोत्तम अष्टपैलूपैकी एक आहे. किरॉन पोलार्डसह त्यानं मुंबई इंडियन्सला अनेक अविश्वसनीय विजय मिळवून दिले आहेत. टीम इंडियासाठी त्यानं आतापर्यंत ६० वन डे व ४८ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये त्यानं ८७ सामन्यांत १५७.२४ च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. बीसीसीआयच्या करारानुसार त्याला ५ कोटी पगार मिळतो, परंतु आयपीएलमधून त्याला ११ कोटी मिळतात ( Hardik Pandya: INR 11 crore in IPL, INR 5 crore by BCCI )

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतो. त्यानं ८६ कसोटी, १२८ वन डे आणि ८१ ट्वेंटी-२० सामन्यांत ऑसी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड त्याला २.६ कोटी रुपये देतात, तर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आयपीएलमध्ये १२ कोटी कमावतो. ( David Warner: ₹12 crores in IPL, INR 2.6 crore by CA)

भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि ट्वेंटी-२०त डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यानं आतापर्यंत ट्वेंटी-२०त ८३ विकेट्स घेतल्या आहेत. बीसीसीआयनं त्याला A+ श्रेणीत समाविष्ठ केले आहे आणि त्याला वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. पण मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला आयपीएलमध्ये १२ कोटी पगार मिळतो. ( Jasprit Bumrah 12 crores in IPL, INR 7 crore by BCCI)

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला असला तरी आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा तो खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून त्याला ८.९ कोटी पगार दिला जातो, पण राजस्थान रॉयल्स या खेळाडूसाठी १२.५ कोटी मोजत आहेत. ( Ben Stokes: 12.5 crores in IPL, INR 8.9 crore by ECB )

भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा उप कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी कोणतीही फ्रँचायझी कोट्यवधींचा पाऊस सहज पाडायला तयार आहे. मुंबई इंडियन्सला सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहितला बीसीसीआयकडून ७ कोटी पगार मिळतो, पण मुंबई इंडियन्स यापेक्षा दुप्पट म्हणजेच १५ कोटी त्याला देतात. ( Rohit Sharma: 15 crore in IPL, INR 7 crore by BCCI)

ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स याला कोलकाता नाईट रायडर्सनं सर्वाधिक बोली लावून आपल्या ताफ्यात घेतले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ४.१ कोटी पगार घेणाऱ्या कमिन्ससाठी KKRनं १६ कोटी मोजले आहेत. ( Pat Cummins: 16 crores in IPL, INR 4.1 crore by CA)

विराट कोहली याला बीसीसीआय ७ कोटी पगार देते, पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार आयपीएलमधून १७ कोटी कमावतो ( Virat Kohli: Rs 17 crore in IPL, INR 7 crore by BCCI)