उद्धवसेनेचे नगरसेवक परभणीत मध्यरात्री दाखल; महापौर निवडीपूर्वी काँग्रेससोबत एकत्रित बैठक
By राजन मगरुळकर | Updated: February 12, 2026 11:16 IST2026-02-12T11:15:46+5:302026-02-12T11:16:23+5:30
बी रघुनाथ सभागृहाच्या परिसराला पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेमुळे छावणीचे स्वरूप आले आहे.

उद्धवसेनेचे नगरसेवक परभणीत मध्यरात्री दाखल; महापौर निवडीपूर्वी काँग्रेससोबत एकत्रित बैठक
परभणी : परभणी शहराच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीला अवघा एक तास शिल्लक आहे. सध्या परभणी महापालिकेतील उद्धवसेना आणि काँग्रेस यांच्या ३७ नगरसेवकांची एकत्रित बैठक पाथरी रोडवरील मोरया लॉन्स येथे सुरू आहे. त्यामुळे अकरा वाजता सुरू होणाऱ्या सभेपूर्वी दोन्ही पक्षाकडून महापौर आणि उपमहापौर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर हे सर्व सदस्य विशेष सभा होणाऱ्या बी रघुनाथ सभागृहात एकत्रित दाखल होणार आहेत.
उद्धवसेनेचे २५ नगरसेवक मुंबईहून मध्यरात्री परभणी शहरातील एका लॉन्सवर दाखल झाले. काँग्रेसचे १२ सदस्य देखील या ठिकाणी सकाळी पोहोचले. बुधवारी रात्री खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सर्व सदस्यांची भेट घेतली. गुरुवारी सकाळपासून सर्व सदस्यांचे एकत्रित चर्चा आणि बैठका सुरू आहेत. महापौर निवडीची आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम बैठक या दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांकडून घेतले जात आहे.
बी.रघुनाथ सभागृहाला छावणीचे स्वरूप
महापौर आणि उपमहापौर यांच्या पदाची निवड वसमत रोडवरील बी रघुनाथ सभागृह येथे अकरा वाजता पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीसाठी पोलीस प्रशासनाने सकाळी नऊ वाजेपासूनच या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. सभागृहातील मुख्य प्रवेशद्वारातून महापालिका आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी यांना ओळखपत्र तपासून सोडले जात आहे तर अकरा वाजता सर्व सदस्य दाखल झाल्यानंतर त्यांचेही ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या निवडीपूर्वीच बी रघुनाथ सभागृहाच्या परिसराला पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेमुळे छावणीचे स्वरूप आले आहे.