Parabhani: सात नगरपालिकांचा रणसंग्राम; मतदारांत उत्साह, चार तासांत २२.५६ टक्के मतदान
By मारोती जुंबडे | Updated: December 2, 2025 12:45 IST2025-12-02T12:44:57+5:302025-12-02T12:45:42+5:30
राजकीय पक्षांची प्रतिष्ठेची लढत, जिल्ह्यातील सात नगरपालिकांमध्ये भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), काँग्रेस, शिवसेना-शिंदे गट आणि ठाकरे गट अशा प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Parabhani: सात नगरपालिकांचा रणसंग्राम; मतदारांत उत्साह, चार तासांत २२.५६ टक्के मतदान
परभणी : जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मंगळवारी सकाळपासूनच मतदारांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. सकाळी ७.३० वाजता मतदानाचा प्रारंभ होताच मतदार केंद्रांकडे पोहोचले. पहिल्या चार तासांतच २२.५६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या उत्साही मतदानामुळे राजकीय पक्षांच्या तळपत्या रणसंग्रामाला आणखी उकळी आली आहे.
सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत जिंतूर नगरपालिका आघाडीवर राहिली. येथे तब्बल १३ टक्के मतदानाने राजकीय समीकरणांना वेगळा रंग दिला. याउलट गंगाखेडमध्ये याच वेळेत केवळ ८ टक्के मतदान झाले. मात्र ९.३० ते ११.३० वाजे दरम्यान जिल्हाभर मतदानाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला. यात जिंतूर नगरपालिकेसाठी सर्वाधिक २७. ८९ टक्के, पाथरी २६.६३,सोनपेठ २२.७२, सेलू २१.२५, पूर्णा २१.११, गंगाखेड १९.९० तर मानवत नगरपालिकेसाठी १७.७९ टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील सात नगरपालिकांमध्ये भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), काँग्रेस, शिवसेना-शिंदे गट आणि ठाकरे गट अशा प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. काही नगरपालिकांत स्थानिक नेतृत्वाचा कस अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. मतदानाचा वाढता टक्का पाहता उमेदवारांची धकधक वाढली असून सर्वच पक्षांनी आपल्या पक्षीय कार्यकर्त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना बाहेर काढण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. दुपारी आणि सायंकाळी मतदान आणखी वेग घेण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.