Maharashtra Election 2019 : परभणीच्या बालेकिल्ल्यात सेनेसमोर नवख्यांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 06:29 PM2019-10-09T18:29:25+5:302019-10-09T18:31:46+5:30

पुढील ११ दिवस उडणार प्रचाराचा धुराळा 

Maharashtra Election 2019 : Newbie's challenge to Shiv Sena in Parbhani's Balekilla | Maharashtra Election 2019 : परभणीच्या बालेकिल्ल्यात सेनेसमोर नवख्यांचे आव्हान

Maharashtra Election 2019 : परभणीच्या बालेकिल्ल्यात सेनेसमोर नवख्यांचे आव्हान

Next
ठळक मुद्दे१५ उमेदवार रिंगणात

- अभिमन्यू कांबळे

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी विधानसभा मतदारसंघात सेनेसमोर यावेळेस काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएमसह अपक्ष उमेदवारांने आव्हान राहणार आहे. १९९० पासून परभणी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व  आहे. या मतदारसंघात शिवसेनेने १९९० ते २०१४ या सलग सहा निवडणुकांमध्ये विजय मिळविला आहे़ आता पुन्हा एकदा शिवसेना सातव्यांदा विजय मिळविण्याच्या इराद्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

यासाठी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी अनेक महिन्यांपासून या निवडणुकीची तयारी चालविली आहे़ त्यांच्या विरोधात काँग्रेसचे रविराज देशमुख उतरले आहेत़ देशमुख हे पहिलीच निवडणूक लढवित असून, उमेदवारी मिळविताना त्यांनी सुरेश नागरे यांच्यावर मात केली़ काँग्रेसचे मराठवाडा प्रभारी माजी खा़ राजीव सातव यांच्यावरील निष्ठा देशमुख यांच्या कामी आली व सातव यांनी दिल्लीत वजन खर्ची करून देशमुख यांना उमेदवारी मिळवून दिली़ परभणीत प्रारंभी नागरे यांनाच काँग्रेसची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती़ नागरे यांनी तशी वातावरण निर्मिती केली होती़ शहरभर ‘मी परेशान परभणीकर’ नावाने त्यांनी राबविलेली मोहीम चर्चेचा विषय होती; परंतु काँग्रेसचे तिकीट मिळविण्यात त्यांना यश आले नाही़ परिणामी ते अपक्ष म्हणून मैदानात आहेत़  वंचित बहुजन आघाडीकडून मोहम्मद गौस झैन निवडणूक लढवित आहेत. गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची ४५ हजार मते घेणाऱ्या एमआयएमकडून यावेळी अली खान निवडणूक लढवित आहेत. प्रहारचे शिवलिंग  बोधने यांच्यासह अन्य उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शिवाय प्रमुख पक्षांचे उमेदवार नवीन असल्याने शिवसेनेसमोर त्यांनी आव्हान निर्माण केले आहे़

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
- परभणी ते जिंतूर, परभणी ते गंगाखेड, परभणी ते मानवत रोड, परभणी ते वसमत या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, यासाठी निधी मंजूर होऊन कामे सुरू झाली; परंतु, या कामांना  गती नाही़ त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून परभणीत प्रवेश करताना मोठा त्रास सहन करावा लागतो़ 
- परभणी शहरातील औद्योगिक वसाहतीला उतरती कळा लागली आहे़ उद्योग नसल्याने व नवीन उद्योगही येत नसल्याने रोजगारासाठी तरुण पुणे, मुंबईकडे धाव घेत आहेत़ या प्रश्नाकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष झाले आहे़ 
- परभणी शहरातील मनपाचे अनेक आरोग्य केंद्र बंद असून, अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे़ शहरातील शिवाजी पार्क, नेहरू पार्कच्या कामासाठी कोट्यवधी  रुपयांचा निधी उपलब्ध झाला; परंतु, मनपाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना त्याचा फायदा झाला नाही़ नाट्यगृहाचा प्रश्न प्रलंबित आहे़ 

डॉ़ राहुल पाटील (शिवसेना)
- गेल्या पाच वर्षात मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली़ आरोग्य शिबीर, रोजगार मेळावा, महिला बचत गटांचा मेळावा आदींच्या माध्यमातून ५ वर्षांत सातत्याने सक्रिय राहिले़ कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क उभारुन निवडणूक यंत्रणा सक्रिय केली़

रविराज देशुमख (काँग्रेस)
तरुण व नवीन चेहऱ्यास काँग्रेसने या निवडणुकीत तिकीट दिले आहे़ कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असले तरी पहिल्याच निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत़ 

मोहम्मद गौस (वंचित)
लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ला चांगली मते मिळाली़ आता सामाजिक समीकरण जुुळवत विजय मिळविण्याच्या इराद्याने गौस झैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे़ राजकीय अनुभव पाठीशी असल्याने वंचितच्या अपेक्षा वाढल्या आहेत़ 

सुरेश नागरे (अपक्ष)
काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने दीड महिन्यात मतदार संघात मोठ्या प्रमाणात प्रचार चालविला़ धार्मिक कार्यक्रमात हिरीरीने घेतलेला सहभाग चर्चेचा विषय झाला़ इतर पक्षातील नेत्यांची मदत घेऊन नागरे निवडणुकीच्या आखाड्यात  उतरले आहेत़

2०14 चे चित्र
राहुल पाटील (शिवसेना-विजयी)  
स.खालेद स.साहेबजान (एमआयएम-पराभूत)

Web Title: Maharashtra Election 2019 : Newbie's challenge to Shiv Sena in Parbhani's Balekilla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.