मतदारांनो, जाणून घ्या तुम्हाला चार प्रभागांसाठी कसे करायचे आहे मतदान ?
By नारायण जाधव | Updated: January 13, 2026 09:26 IST2026-01-13T09:26:38+5:302026-01-13T09:26:38+5:30
एकाचवेळी तीन ते चार वेळा मतदान करायचे आहे.

मतदारांनो, जाणून घ्या तुम्हाला चार प्रभागांसाठी कसे करायचे आहे मतदान ?
नारायण जाधव
१५ जानेवारी रोजी २९ महापालिकांसाठी मतदान होणार आहे. एकाचवेळी तीन ते चार वेळा मतदान करायचे आहे. जाणून घ्या याची नेमकी प्रक्रिया....
मतदान केंद्रात प्रवेश केल्यावर निवडणूक अधिकारी तुमची ओळख (मतदार ओळखपत्र किंवा इतर पुरावा) तपासून तुमची नोंद करतील. तुमच्या बोटाला शाई लावली जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी ईव्हीएमकडे जाता येईल.
ईव्हीएमद्वारे (EVM) मतदान : या निवडणुकीत ४ स्वतंत्र जागांसाठी मतदान करायचे आहे. प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकेचा रंग वेगळा असेल.
कशी असेल मतदान प्रक्रिया? कधी येईल बीपचा आवाज
प्रत्येक मतदाराने प्रभागातील 'अ', 'ब', 'क', 'ड' अशा प्रत्येक जागेकरिता प्रत्येकी एक मतदान करावयाचे आहे. म्हणजेच ज्या प्रभागांमध्ये ४ उमेदवार असतील तेथे चौघांना आणि जेथे तीन वा दोन उमेदवार असतील तेथे अनुक्रमे ३ व २ सदस्यांना मतदान करावयाचे आहे.
'अ', 'ब', 'क', 'ड' जागेमध्ये नमूद एका उमेदवारास मतदान करावयाचे आहे.
'अ'मधील उमेदवारासमोरचे बटण दाबल्यानंतर त्यासमोरील लाल दिवा पेटेल, मग 'ब'मधील उमेदवारासमोरील बटण दाबल्यानंतर त्यासमोरील लाल दिवा पेटेल व अशाच प्रकारे 'क' आणि 'ड' जागेमधील उमेदवारासमोरील बटन दाबल्यानंतर लाल दिवा पेटेल.
चारही जागांसाठी प्रत्येक जागेसाठी एक अशाप्रकारे मतदान केल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन शेवटी 'बीप' असा आवाज येईल. बीपचा आवाज आला म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली, असे समजावे.
मतदाराला 'अ', 'ब', 'क', 'ड' अशा प्रत्येक जागेसाठी एक असे स्वतंत्र मत द्यायचे आहे. 'अ' किंवा कोणत्याही एकाच जागेसाठी चारही मते देता येणार नाहीत.
'एक जागा, एक मत' याच सूत्राने 'अ', 'ब', 'क', 'ड' अशा जागांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र मत द्यायचे आहे. कोणताही उमेदवार पसंत नसेल, तर उमेदवारांची यादी संपल्यानंतर शेवटी 'नोटा' (NOTA) हा पर्याय उपलब्ध असेल.
पहिली ३ बटने दाबल्यावर उमेदवारासमोरील लाल दिवा लागेल, पण 'बीप' असा आवाज येणार नाही.
जेव्हा तुम्ही चौथ्या (शेवटच्या) जागेसाठी बटन दाबाल, तेव्हाच 'बीप'चा गजर ऐकायला येईल.
'बीप' वाजल्याशिवाय तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असे समजू नका.
एखाद्या उमेदवाराला मत द्यावयाचे नसेल तर नोटा बटन दाबावे लागणार आहे.
'बीप' वाजल्यानंतर तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होते. आता तुम्ही मतदान कक्षातून बाहेर पडू शकता.
मतदान वैध व अवैध कसे ठरेल?
नव्या रचनेनुसार एक प्रभाग म्हणजे चार नगरसेवक. त्यामुळे एका मतदाराला चार उमेदवारांना मतदान करावं लागेल. याचा अर्थ असा की तुम्हाला ईव्हीएमवर चार वेळा बटन दाबावे लागेल. ही चारही मते देणे बंधनकारक आहे. जर तुम्ही चारपैकी एखादं मत दिलं नाही, तर तुमचं संपूर्ण मतदान अवैध ठरू शकते.
कमी जागी मतदान केले तर?
एका मतदाराला चार उमेदवारांना मतदान करावयाचे आहे. दोन किंवा तीन उमेदवारांनाच मतदान केले व तिसऱ्या किंवा चौथ्या उमेदवाराला मतदान केले नाही. तसेच नोटा बटन न दाबल्यास मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. अशावेळी मतदान अधिकारी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नोटाचे बटन दाबतील व प्रक्रिया पूर्ण करतील.