नावेच गायब झाल्याने ठाण्यातील मतदार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:26 AM2019-04-30T01:26:41+5:302019-04-30T01:27:21+5:30

मतदार यादीत घोळ : कुटुंबियांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात

Voters deprived in Thane due to missing name | नावेच गायब झाल्याने ठाण्यातील मतदार वंचित

नावेच गायब झाल्याने ठाण्यातील मतदार वंचित

googlenewsNext

ठाणे : ठाणे शहरातील चरईतील मतदानकेंद्रांमध्ये मतदारांची नावेच मतदारयादीतून गायब झाल्यामुळे अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. तर, पत्ता बदलल्याचे पत्र देऊनही एकाच घरातील पतीचे नाव नाही, तर पत्नी आणि मुलांची नावे आल्यानेही अशोक जैन (४८) या चरईतील मतदाराला मतदानापासून मुकावे लागल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

चरईतील शांती पॅलेस येथे राहणाऱ्या अमृतबेन छाडवा (५८) आणि नानजी छाडवा (६३) या दाम्पत्याला मात्र मतदारयादीत नावच नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता आला नाही. चरईतील दगडी शाळेत ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सोमवारी सकाळी ९ वाजता गेले होते. त्यांच्याकडे आधारकार्ड आणि इतर कागदपत्रेही होती. गेल्या ३० वर्षांपासून छाडवा कुटुंब चरईत वास्तव्याला आहे. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी मतदान केलेले असतानाही यावेळी मात्र मतदारयादीतील नावच गायब झाल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले होते. मतदारचिठ्ठी घेऊनही त्यांच्याकडे निवडणूक कार्यालयातील कोणी मतदान प्रतिनिधी (बीएलओ) फिरकले नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर, अशोक जैन (४८) हे चरईतील ‘कृष्णा हेरिटेज’ या इमारतीमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांनी पत्नी संतोषीदेवी (४६) तसेच चिराग (२६) आणि सुमित (२४) या दोन मुलांचाही पत्ता बदलल्याचे पत्र मे २०१८ मध्येच जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे दिले होते. त्यानंतर, ‘आठ-ए’च्या फॉर्मची प्रक्रि या बाकी असल्याचे त्यांना एप्रिल २०१९ मध्ये सांगण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी आणि मुलांची नावे मतदारयादीत आली. पण, अशोक यांचे स्वत:चे नाव मात्र यादीत आलेच नाही. त्यामुळे त्यांनीही निवडणूक आयोगाच्या या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

चरईत राहणाºया राजेश पासूभाई लालका (५३) यांनाही असाच अनुभव आला. ते चरईतल्या दगडी शाळेत मतदानासाठी गेले. परंतु, त्यांचे राजेश पासूभाई शहा या नावाने यादीत नाव आले. लालका हे आधी मुलुंडमध्ये वास्तव्याला होते. त्यांनी ठाण्यात आल्यानंतर शहाऐवजी लालका असे नाव बदलले. या बदललेल्या नावाची त्यांनी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे नोंदही केली. लालका या नावानेच त्यांनी यापूर्वी मतदानही केले. पण, यावेळी त्यांना मतदारचिठ्ठी लालकाऐवजी शहा नावाने आली. अर्थात, शहा या नावाचे त्यांचे कोणतेच ओळखपत्र नाही. शिवाय, त्यांची पत्नी रीता राजेश लालका यांचेही पॅनकार्ड, आधारकार्ड आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र हे लालका या आडनावानेच आहे. पण, केवळ आधी त्यांनी बदललेल्या शहा या नावाने मतदारचिठ्ठीत नाव आल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्का बजावताच आला नाही.

राजेश लालका यांचा मोठा मुलगा हिमांशू (२४) याचे मात्र लालका नावाने यादीत नाव आले. त्यामुळे त्याला मतदानाचा हक्का बजावता आला. पण, त्यांचा धाकटा मुलगा प्रेमांशू (२३) याचेही यादीत नाव नसल्यामुळे त्यालाही मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
‘‘गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीला मी मतदान केले. पण, यावेळी मतदारयादीत नाव नसल्यामुळे मला आणि पत्नी अमृतबेन हिला मतदान करता आले नाही. कोणताही दोष नसताना मतदानास अपात्र ठरवले जात असेल, तर यात कुठेतरी सुसूत्रता येणे अपेक्षित आहे.’’
- नानजी छाडवा, चरई, ठाणे

श्रीरंग विद्यालयाच्या मतदानकेंद्रामध्ये तासभर उभे राहूनही प्रत्यक्ष मतदानासाठी क्रमांक येत नसल्यामुळे अनेक मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर, व्हीव्हीपॅटद्वारे येणारी मतदानाची स्लिप पाहण्यातही सात सेकंदापेक्षा जास्त वेळ काही मतदार घेऊन रेंगाळत असल्यामुळेही हा वेळ लागत असल्याचा दावा मतदान अधिकाऱ्यांनी केला.

Web Title: Voters deprived in Thane due to missing name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.