नवी मुंबईत शिंदेसेना-भाजपमध्येच रस्सीखेच; मविआची धडपड सुरू
By नामदेव मोरे | Updated: December 23, 2025 09:56 IST2025-12-23T09:55:53+5:302025-12-23T09:56:28+5:30
शिंदे-नाईक यांच्या वर्चस्वाची कसोटी; स्वबळावर सत्ता मिळवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह

नवी मुंबईत शिंदेसेना-भाजपमध्येच रस्सीखेच; मविआची धडपड सुरू
- नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिकेच्या स्थापनेपासून पक्ष कोणताही असो नवी मुंबईवर गणेश नाईक यांचेच वर्चस्व राहिले आहे. ते संपवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. यावेळच्या निवडणुकीमध्येही दोघांमध्ये सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. येथे महाविकास आघाडीला अस्तित्वासाठी धडपडावे लागत असून, खरी स्पर्धा शिंदेसेना व भाजप अर्थात नाईकांमध्येच सुरू आहे.
भारतीय जनता पक्ष व शिंदेसेनेमध्ये नवी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. यासाठी दोन्ही पक्षांनी महाविकास आघाडीमधील उद्धवसेना, काँग्रेस व शरद पवार गटाचे तुल्यबळ उमेदवार फोडून त्यांना पक्षात प्रवेश दिले आहेत. कोणत्याही स्थितीमध्ये स्वबळावर सत्ता मिळवायची महत्त्वाकांक्षा दोन्ही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी बोलून दाखवत आहेत. युती नकोच, अशी भूमिकाही ते मांडत आहेत.
प्रशासकीय राज संपणार
कोरोनामुळे निवडणूक रद्द झाली. परिणामी, नवी मुंबई महापालिकेवर ७ मे २०२० पासून प्रशासकराज आहे. मनपाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच प्रदीर्घ काळ प्रशासक असून, या पाच वर्षांत तीन आयुक्तांनी प्रशासक म्हणून कामकाज पाहिले आहे. निवडणुकीच्या रुपाने हे प्रशासक राज संपणार असल्याने हे सत्ता मिळवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
कोणते मुद्दे ठरतील निर्णायक?
धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचे श्रेय कोणाचे.
मुंबईच्या धर्तीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करणे.
प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांसह माथाडींची वाढीव बांधकामे नियमित करणे.
पुनर्बांधणी प्रकल्पांमुळे भविष्यातील सोयी-सुविधांवरील ताण.
सत्तेसाठी शिंदेसेना व भाजपमध्ये स्पर्धा सुरू आहे. महायुतीतील अजित पवार गट व मविआतील उद्धवसेना, काँग्रेस, शरद पवार पक्ष व मनसेलाही येथे अस्तित्व सिद्ध करण्यास संघर्ष करावा लागत आहे. तर गणेश नाईक व मंदा म्हात्रेंतील वाद लक्षात घेऊन भाजप श्रेष्ठींनी पनवेलचे आ. विक्रांत पाटील यांना प्रभारी म्हणून धाडले आहे.
वाढलेल्या मतदारसंख्येचा लाभ कुणाला हाेणार? : मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी १ लाख ३३ हजार ३९३ मतदार वाढले आहेत. यामुळे युती झाली नाही तर वाढीव मतदान शिंदेसेनेच्या पारड्यात जाणार की भाजपच्या याविषयी उत्सुकता आहे.