निवडणुकीची प्रक्रिया होणार सहज, सुलभ; प्रत्येक निवडणूक कार्यालयात १० कक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:51 IST2025-12-26T09:50:58+5:302025-12-26T09:51:11+5:30
प्रत्येक कामासाठी स्वतंत्र कक्ष असून उमेदवारी अर्ज भरताना व इतर कामांसाठी कार्यालयात येणाऱ्यांमुळे होणारी गर्दी त्यामुळे टळणार आहे शिवाय वाहतूक कोंडी होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे.

निवडणुकीची प्रक्रिया होणार सहज, सुलभ; प्रत्येक निवडणूक कार्यालयात १० कक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : निवडणुकीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी शहरात आठ निवडणूक कार्यालये सुरू केली आहेत. सर्व कार्यालयांत १० विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र कक्ष असून उमेदवारी अर्ज भरताना व इतर कामांसाठी कार्यालयात येणाऱ्यांमुळे होणारी गर्दी त्यामुळे टळणार आहे शिवाय वाहतूक कोंडी होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे.
निवडले जाणार १११ सदस्य
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी २८ प्रभागांमध्ये १११ सदस्य निवडले जाणार आहेत. गत निवडणुकीत एवढीच सदस्यसंख्या होती. ५६८ उमेदवारी रंगणात होते.
यावेळेसही उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. आठ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू केले आहे.
येथे निवडणूक कार्यालये
दिघा माता व बालरुग्णालय दिघा
ऐरोली सरस्वती विद्यालय सेक्टर ५
घणसोली समाजमंदिर हॉल सेक्टर ७
कोपरखैरणे अण्णासाहेब पाटील सभागृह,
सेक्टर ५, कोपरणखैरणे
सानपाडा अण्णा भाऊ साठे सभागृह, सेक्टर १०
वाशी जलतरण तलाव संकुल, वाशी
नेरूळ आगरी कोळी भवन, सेक्टर २४
बेलापूर विभाग कार्यालय, सेक्टर ११
या असणार सोयी-सुविधा
कार्यालय प्रशस्त जागेत सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक कार्यालयात पहिल्या टप्यात १० कक्ष सुरू केले आहेत.
यामध्ये एक खिडकी विभाग, मतदार सहायता केंद्र, आवक जावक विभाग, नामनिर्देशन पत्र विक्री केंद्र, लेखा विभाग, ईव्हीएम व्यवस्थापनव सुरक्षा कक्ष, आचारसंहिता पथक, मनुष्यबळ व्यवस्थापन , संगणक कक्ष व मीडिया मॉनिटरिंग कक्ष तयार केला आहे. सर्व कक्षांना संगणक व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे.
निवडणूक कार्यालयाच्या दोन्ही बाजूला बॅरीकेड्स
निवडणूक निर्णय कार्यालयात गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. चार कार्यालयात प्रत्येकी ३ प्रभागांची व ४ कार्यालयांमध्ये प्रत्येकी ४ प्रभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कार्यालयाच्या बाहेर अर्ज भरताना गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. निवडणूक कार्यालयाच्या दोन्ही बाजूला बॅरीकेड्स लावण्यात येत आहेत.