४० हजार मतदारांपर्यंत नऊ दिवसांत पोहोचण्याचे आव्हान; मतदारसंघातून नवी मुंबई महापालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 10:02 IST2026-01-05T10:02:28+5:302026-01-05T10:02:41+5:30
एक प्रभागाचा विचार करून दहा वर्षे सामाजिक उपक्रम करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांची समीकरणे बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे बिघडली आहेत.

४० हजार मतदारांपर्यंत नऊ दिवसांत पोहोचण्याचे आव्हान; मतदारसंघातून नवी मुंबई महापालिका
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : प्रभागनिहाय लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराला गती देण्यास सुरुवात केली आहे. फक्त ९ दिवस शिल्लक असल्यामुळे ३० ते ४० मतदारांपर्यत हजार पोहोचण्याचे आव्हान सर्वासमोर उभे राहिले आहे. रविवारी उमेदवारांनी सभांपेक्षा जास्तीत जास्त गृहभेटींचे नियोजन केले आहे.
एक प्रभागाचा विचार करून दहा वर्षे सामाजिक उपक्रम करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांची समीकरणे बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे बिघडली आहेत. अनेक उमेदवारांसाठी पूर्वीपेक्षा चारपट आकाराच्या प्रभागात काम करावे लागत असून त्यापैकी ६० ते ७० टक्के मतदार अनोळखी आहेत. यामुळे नवीन मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पेलताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्यांच्या सभांपेक्षा उमेदवारांकडून घरोघरी जाऊन संवाद साधण्याला पसंती दिली जात आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजणार प्रचार रॅली
भाजपच्या प्रचार रॅलीमध्येच प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवी मुंबईची निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी होणार आहे. अप्रत्यक्षपणे शिंदेसेना व भाजपमध्ये लढत होणार असून आरोप-प्रत्यारोप होण्याचे सूतोवाचही केले आहे. मनसे व उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सत्ताधारी शिंदेसेना व भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
प्रभागात अनुभवी उमेदवार आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु नवीन सहउमेदवार असणारांना संपूर्ण प्रभाग पिंजून काढताना कसरत करावी लागत आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा नारळ फोडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवार निश्चितीपूर्वीच एक मेळावा घेऊन अप्रत्यक्षपणे प्रचाराचा नारळ फोडला होता.
कमी कालावधी असल्यामुळे प्रत्येक घरी भेट देण्याबरोबर कोपरा सभा व मोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये संवाद मेळ्याचे आयोजन केले जात आहे. भाजप, शिंदेसेना यांचे अनेक राज्यस्तरीय नेते प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत.