आर्थिक सत्तेसाठीच होणार रणकंदन
By नारायण जाधव | Updated: January 5, 2026 10:29 IST2026-01-05T10:29:07+5:302026-01-05T10:29:07+5:30
उमेदवारी अर्ज माघारीनंतर मुख्य लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.

आर्थिक सत्तेसाठीच होणार रणकंदन
नवी मुंबई - पनवेल, नारायण जाधव, उप वृत्तसंपादक
राज्यातील महापालिकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यात जेएनपीएससह आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जगाच्या नकाशावर गेलेल्या महामुंबईतील नवी मुंबई आणि पनवेल या दोन महापालिकांकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. कारण, नव्या विमानतळामुळे या दोन महानगरांच्या परिसरात एज्युसिटी, एरोसिटीसह केंद्र सरकारचा युनिटी मॉल, भारत मंडपमसह आफ्रिका इंडिया बिझनेस सेंटर, बेलापूरला प्रस्तावित शीपयार्डसह विमानतळानजीक तिसरी मुंबईसारखे मोठे प्रकल्प आकार घेत आहेत. यातील काही प्रकल्प महापालिकांच्या कार्यक्षेत्राबाहेर असले, तरी त्यांचे मार्ग मात्र या दोन शहरांतूनच जातात. यामुळे या दोन्ही महापालिकांवर सत्ता आपलीच हवी, यासाठी सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने उतरले आहेत. कारण, नवी मुंबई महापालिकेचे बजेट पाच हजार कोटी, तर पनवेलचे चार हजार कोटींच्या घरात असले, तरी या बजेटपेक्षा उपरोक्त प्रकल्पांत लाखो कोटींची गुंतवणूक हाेणार असल्याने दोन्ही शहरांत सत्तासोपानावर आरूढ होण्यासाठी येत्या १० दिवसांत राजकीय रणकंदन माजलेले दिसेल.
उमेदवारी अर्ज माघारीनंतर मुख्य लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईत ४९९ उमेदवार रिंगणात असले, तरी मुख्य लढत शिंदेसेना आणि भाजपमध्येच आहे. येथील तिकीट वाटपात भाजपने वनमंत्री गणेश नाईक यांना पूर्णत: माेकळीक दिली आणि आमदारकीची हॅट् ट्रिक साधणाऱ्या मंदा म्हात्रेंच्या समर्थकांची तिकिटे कापली. त्यामुळे त्या पक्षावर नाराज आहेत. त्यांची नाराजी पक्ष आणि वनमंत्री नाईक कशी दूर करतात, हे लवकरच कळेल. त्यांना नाराज ठेवल्यास पक्षाची डोकेदुखी वाढू शकते.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचाराचा अजेंडा काय असेल, याचे संकेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. भाषणात त्यांनी कुणाचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा पूर्ण राेख एकनाथ शिंदेंवर होता. ‘समोरच्यांकडे ‘लाडकी बहीण’शिवाय दुसरे कोणतेच मुद्दे नाहीत. त्यासाठी तुम्ही महिला बचत गटांना एकत्र आणून उत्तर द्या. समोरचे सत्तेवर आल्यास भ्रष्टाचार वाढेल’, अशी टिप्पणी करून प्रशासकीय राजवटीत नवी मुंबई महापालिकेत कशी अनागोंदी माजली, नको ती कामे कशी कोणासाठी आणि कोणाच्या दबावाखाली काढली, याकडे लक्ष वेधून चव्हाण यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे बोट दाखविले आहे. यामुळे आतापर्यंत शिंदेंचा नामोल्लेख टाळून शेलक्या विशेषणांनी त्यांची हेटाळणी करणाऱ्या नाईकांना प्रचारातही मोकळे रान मिळेल, असे सांगण्यात येते.
नवी मुंबईसह पनवेलचा जसजसा विकास असला तरी दोन्ही शहरांत वाहतुकीचे नियोजन नाही. आधीच टीटीसी आणि तळोजा, रसायनी औद्योगिक वसाहत, एपीएमसी मार्केट, कळंबोलीचे स्टील मार्केट आणि जेएनपीएमुळे दोन्ही शहरांत अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच आता विमानतळाची भर पडली आहे. यामुळे दोन्ही शहरांत वाढीव ट्रक टर्मिनलसह पूल, कोस्टल रोडची नितांत गरज आहे. सिडकोने वाशीत ट्रक टर्मिनलच्या जागी आवास प्रकल्प उभारून नियोजनशून्यतेचे दर्शन घडवूनही सर्वांनीच मौन बाळगले. हा मुद्दा प्रचारात पेटणार आहे.
५०हून अधिक माजी नगरसेवक शिंदेसेनेच्या गळाला
भाजपच्या तुलनेत शिंदेसेनेने ५०हून अधिक माजी मातब्बर नगरसेवक गळाला लावून भक्कम फळी उभी केली आहे. मात्र, त्यांच्याकडे विजय नाहटा, नरेश म्हस्के, किशोर पाटकर वगळता सक्षम वक्ते नाहीत. तर, महाविकास आघाडीत लढण्याआधीच बिघाडी झाली आहे. मनसेच्या हट्टामुळे राष्ट्रवादी (शरद पवार)ने आघाडीचा नाद सोडल्याने दोन्ही ठाकरे बंधूच मैदानात उरले आहेत.
शेकाप नेतृत्वहीन?
तिकडे पनवेलमध्ये २५५ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप-महाविकास आघाडी अशीच लढत आहे. त्यात भाजपने सहा उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत. शिवाय विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्या बहिणीसाठी स्वपक्षीय उमेदवारास माघार घ्यायला लावून त्यांनाही बिनविरोध निवडून आणले आहे. सात उमेदवारांची निवड बिनविरोध करून भाजपने म्हणण्यापेक्षा रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी चुणूक दाखवली आहे. यामुळे बाळाराम पाटील वगळता नेतृत्वहीन झालेल्या शेकापचे अवसान गळाले आहे. प्रमुख नेते विवेक पाटील तुरुंगात असल्याने त्यांची उणीव ‘शेकाप’ला भासत आहे.