दबावतंत्र; ‘एबी फॉर्म’विना अपक्ष उमेदवारीचा फार्स; गॉड फादरच्या मदतीने पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याची खेळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 09:42 IST2025-12-30T09:42:13+5:302025-12-30T09:42:28+5:30
...यामुळे मतदारांत अमक्याने तमक्या पक्षाकडून अर्ज भरला, असे वातावरण तयार झाले आहे; परंतु ‘एबी फॉर्मशिवाय या अर्जांना अर्थ नसला तरी संबंधित इच्छुकांचा आपल्या गॉड फादरच्या मान्यतेने हा एक दबावतंत्राचा फार्स असल्याची चर्चा आहे.

दबावतंत्र; ‘एबी फॉर्म’विना अपक्ष उमेदवारीचा फार्स; गॉड फादरच्या मदतीने पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याची खेळी
नारायण जाधव -
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी महायुती वा महाविकास आघाडी यापैकी सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नवी मुंबईसह पनवेलमध्ये कोणत्याच पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. तरीदेखील दोन्ही शहरांत अनेक माजी नगरसेवकांसह विविध पक्षांच्या पदाधिकारी, त्यांच्या नातेवाइकांनी आपापले नामांकन अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे भरले आहेत. यामुळे मतदारांत अमक्याने तमक्या पक्षाकडून अर्ज भरला, असे वातावरण तयार झाले आहे; परंतु ‘एबी फॉर्मशिवाय या अर्जांना अर्थ नसला तरी संबंधित इच्छुकांचा आपल्या गॉड फादरच्या मान्यतेने हा एक दबावतंत्राचा फार्स असल्याची चर्चा आहे.
नवी मुंबई आणि पनवेलमध्ये शिंदेसेना आणि भाजपची महायुती फिसकटल्यात जमा आहे, तर महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोणत्या पक्षाने कोणत्या जागा लढायच्या याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे. नवी मुंबईत १११ जागांसाठी अडीच हजारांवर इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत, तर अडीच हजारांवर जणांनी नामांकन अर्ज विकत घेतले आहेत. यातील अनेकांनी सोमवारी शक्तिप्रदर्शन करून आपले नामांकन अर्ज भरले आहेत. ‘एबी फॉर्म नसताना कसे काय अर्ज भरले याची चर्चा सुरू आहे; परंतु पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यासाठी खेळलेली ही एक खेळी असल्याचे यामागे सांगण्यात येत आहे. कारण मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरला अर्जांची छाननी होण्याआधीपर्यंत आता नामांकन अर्ज भरलेले उमेदवार आपला ‘एबी फॉर्म जमा करू शकतात.
यांनी भरला अर्ज
एका घरात दोनहून अधिक तिकिटे हवे असलेले उमेदवार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी यांचे नातेवाईक असलेले इच्छुकांनी प्रामुख्याने साेमवारी पनवेल, नवी मुंबईतून नामांकन अर्ज भरले आहेत. काही जण मंगळवारी भरण्याच्या तयारी आहेत. जेणेकरून ‘एबी फॉर्मसाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणता येईल. अर्ज भरणाऱ्यांमध्ये शिंदेसेना आणि भाजप, उद्धवसेना, तसेच शेकापच्या इच्छुकांचा जास्त भरणा असल्याची चर्चा आहे.
अनेकांचे दोन-दोन अर्ज
नियम ओळखून अनेकांनी दोन दोन अर्ज भरले आहेत. यात एक अर्ज अपक्ष म्हणून तर एक पक्षाकडून भरला आहे. यात पक्षाने ‘एबी फॉर्म दिला नाहीतर आम्ही बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी लढू शकतो, असा दबाव आणण्याची काहींची खेळी आहे. यासाठी काहींना संबंधित गॉड फादरचीसुद्धा मूकसंमती असल्याचे सांगतात.