मत कुणाला? अनुभवी की युवा उमेदवाराला? २१ वर्षांचे दोघे, तर ७४ वर्षांचे ज्येष्ठही निवडणुकीच्या रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 08:56 IST2026-01-07T08:56:56+5:302026-01-07T08:56:56+5:30
सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निवडताना तरुणांना संधी देण्याबरोबर ज्येष्ठांचाही सन्मान राखला आहे.

मत कुणाला? अनुभवी की युवा उमेदवाराला? २१ वर्षांचे दोघे, तर ७४ वर्षांचे ज्येष्ठही निवडणुकीच्या रिंगणात
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अनुभवी नगरसेवक महापालिकेत पाठवावा की अनुभवी आणि ज्येष्ठ, याचा फैसला मतदारांना करावा लागेल. नवी मुंबई महापालिकेच्या १११ जागांसाठी नशीब आजमावत असलेल्या ४९९ उमेदवारांमध्ये २१ वर्षांचे दोन युवा आहेत, तर सत्तरी पूर्ण केलेले दोघे आहेत. ३० ते ५० वयोगटातील सर्वाधिक २९३ उमेदवारांचा समावेश आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निवडताना तरुणांना संधी देण्याबरोबर ज्येष्ठांचाही सन्मान राखला आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कुटुंबातील तरुणांना रिंगणात उतरविले आहे.
शिंदेसेनेच्या सोनवी लाड व मनसेचे चेतन काळे हे दोन उमेदवार २१ वर्षांचे आहेत. दीक्षा कचरे ही २२ वर्षांची तरुणीही कोपरखैरणेतून उमेदवार आहे. २१ ते ३० वयोगटातील ५० जणांना पक्षांनी उमेदवारी दिली आहे. ६१ ते ७० वयाचे ३७ जण लढत आहेत. सत्तरीच्या पुढील दोघांचा समावेश
आहे. उमेदवारांनी आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांतून ही माहिती मिळाली आहे.
ठाण्यात तिशीपर्यंतचे ९ उमेदवार मैदानात
ठाणे महापालिकेत २३ वर्षांच्या तरुणांपासून ते ७४ वर्षांच्या अनुभवी ज्येष्ठांपर्यंत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे ही निवडणूक तरुणाई आणि अनुभव यांचा अनोखा संगम ठरत आहे.
या निवडणुकीतील सर्वांत लहान वयाचे उमेदवार २३ वर्षांचे असून, सर्वाधिक वयाचे उमेदवार ७४ वर्षांचे आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक ३३ मध्ये दोन सर्वांत कमी वयाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार)चे खांचे मोहम्मद जैद अनिफ खांचे हे प्रभाग क्रमांक ३३ ‘क’ मधून रिंगणात उतरले असून, त्यांच्याविरोधात भाजपच्या आतिया जावेद शेख या उमेदवार मैदानात आहेत. हे दोन्ही उमेदवार केवळ २३ वर्षांचे आहेत.
दुसरीकडे, वृद्ध व अनुभवी उमेदवारही निवडणुकीत सक्रिय आहेत. शिंदेसेनेचे देवराम भोईर हे प्रभाग क्रमांक ८ ‘क’ मधून रिंगणात असून ते ७४ वर्षांचे आहेत. त्यांच्यानंतर उद्धवसेनेचे सुखदेव उबाळे हे ७३ वर्षांचे आहेत.
भिवंडीत ८४ वर्षांच्या आज्जीही रिंगणात
भिवंडी : नगरसेवक निवडणुकीत २१ ते ३२ वयोगटातील तरुणांबरोबरच ८४ वर्षीय साखराबाई गेणू बगाडे रिंगणात आहेत. ५५ ते ८४ वयोगटातील ज्येष्ठही नशीब अजमावत आहेत. २१ वर्षांचे मित चौघुले हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात २८ वर्षीय मयुरेश पाटील आहेत. ईशा इमरान खान या उमेदवार २३ वर्षे वयाच्या आहेत. तेजस काटेकर, सिद्धी पाटील व विराज पवार हे २४ वर्षांचे आहेत, तर दिव्या पाटील यांचे वय २६ वर्षे आहे. जावेद दळवी (६९), मनोज काटेकर (५९) विलास पाटील (५८), प्रकाश टावरे (६९), दक्षाबेन पटेल (६७), बाळाराम चौधरी (६१) हे ज्येष्ठ उमेदवार आहेत.
ठाण्यात सर्वपक्षीय उमेदवार ‘नामचीन’
ठाणे : सर्वपक्षीय उमेदवारांवर गंभीर, राजकीय व किरकोळ गुन्हे दाखल आहेत. माजी विरोधी पक्षनेते तसेच शिंदेसेनेचे उमेदवार देवराम भोईर यांच्याविरोधात १९९७ साली भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यांचे पुत्र संजय भोईर यांच्याविरोधात २०१२ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. शिंदेसेनेचेच मनोज शिंदेंवर १४ गुन्हे प्रलंबित आहेत. याशिवाय, राष्ट्रवादी (अजित पवार) व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातही गुन्हेगार उमेदवार आहेत.
भिवंडीत अनेक उमेदवारांवर गुन्हे
भिवंडी : अनेक उमेदवारांवर हत्या, मारहाण आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. माजी महापौर विलास पाटील यांच्यावर ४ गुन्हे दाखल आहेत. भाजपचे यशवंत टावरेंवर भिवंडी व उत्तर प्रदेशात दोन गुन्हे दाखल आहेत. संतोष शेट्टींवर ३, संजय म्हात्रे आणि माजी उपमहापौर मनोज काटेकर यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. तर नीलेश चौधरी यांच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल आहेत, तर राष्ट्रवादी (अजित पवार)चे सुशांत म्हात्रे यांच्यावर नारपोली पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल आहे.
सत्तेची चावी ४० ते ५५ वयोगटाकडे
उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत २४ वर्षांच्या अक्षता टाले या सर्वांत तरुण उमेदवार आहेत, तर ६७ वर्षीय राजेंद्रसिंग भुल्लर हे सर्वांत ज्येष्ठ उमेदवार आहेत. सर्वाधिक उमेदवार हे ४० ते ५५ वयोगटातील असून हा गटच पालिकेची सत्तेची चावी कोणाकडे जाणार, हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यंदा २४ ते २८ वयोगटातील उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ उमेदवारांनी रंगत आणली आहे.
उल्हासनगरात २०% उमेदवार गुन्हेगार
उल्हासनगर : शिंदेसेनेचे उमेदवार राजेंद्र चौधरींवर सर्वाधिक १६ गुन्हे दाखल आहेत, तर भाजपचे प्रधान पाटील यांच्यावर विविध प्रकारचे पाच गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारीमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार आघाडीवर असल्याचे त्यांनी आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून दिसून येते. दाखल गुन्ह्यांपैकी काही राजकीय आंदोलनातील गुन्हेही आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शिंदेसेनेचे महेश सुखरामानी, धनंजय बोडारे व तिसरा क्रमांक भाजपचे प्रधान पाटील यांचा आहे. शिंदेसेनेचे अरुण अशान, चंद्रशेखर यादव, महेश सुखरामनी, दुर्गाप्रसाद राय आणि विजय पाटील यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवरही विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अनेकजण जेलवारीही करून आले आहेत.
सर्वांत कमी वय असलेले उमेदवार
उमदेवार वय
सोनवी लाड २१
कुणाल गवते २१
चेतन काळे २१
दिक्षा कचरे २२
भाग्यश्री साळवे २२
शुभम चौगुले २३
सुदर्शन विघ्ने २३
नयन पाटील २३
तबस्सूम पटेल २३
प्राजक्ता भगत २५
कलीम पटेल २६
सर्वांत जास्त वय असलेले उमेदवार
उमेदवार वय
एकनाथ माने ७४
कुरेशी जुल्फीकार अब्दुल सत्तार ७१
जयाजी नाथ ६९
कांतीलाल जैन ६९
प्रमोद जोशी ६८
मंदाकिनी कुंजीर ६८
देवराम सूर्यवंशी ६८
अनंत सुतार ६७
परशूराम मेहेर ६७
केशव म्हात्रे ६७
शशिकांत राऊत ६७