कमळावर उमटली ९ लाख मतांची मोहोर; धनुष्याला ७ लाख, तर मशालीला १ लाख ९८ हजारांची पसंती
By नामदेव मोरे | Updated: January 19, 2026 12:40 IST2026-01-19T12:40:29+5:302026-01-19T12:40:44+5:30
नवी मुंबई महापालिका निवडणूक पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने झाली. २८ प्रभागांमधील १११ सदस्य निवडीसाठी ९ लाख ४८ हजार ४६० मतदारांची नोंदणी झाली होती.

कमळावर उमटली ९ लाख मतांची मोहोर; धनुष्याला ७ लाख, तर मशालीला १ लाख ९८ हजारांची पसंती
- नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. २८ प्रभागांमध्ये कमळावर ९ लाख ४० हजार मतांची मोहोर उमटली आहे. यानंतर ७लाख ४ हजार मते शिंदेसेनेच्या धुनष्यबाणाला मिळाली आहेत. उद्धवसेनेने १ लाख ९८ हजार मतांचा पल्ला गाठला असून, उर्वरीत एकही पक्षाला एक लाखाचा पल्ला गाठता आला नाही.
नवी मुंबई महापालिका निवडणूक पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने झाली. २८ प्रभागांमधील १११ सदस्य निवडीसाठी ९ लाख ४८ हजार ४६० मतदारांची नोंदणी झाली होती. ५७.१५ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. ५ लाख ४२ हजार ७४ नागरिकांनी मतदान केले. एक मतदाराला एका प्रभागात अ, ब, क, ड अशा चार पैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य होते. निवडणुकीमध्ये भाजपने सर्व १११ जागांवर उमेदवार उभे केले होते. मतदारांचा सर्वाधिक कौलही त्यांनाच मिळाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सर्व जागांवर मिळून ९ लाख ४ हजार ६६ वेळा कमळाचे बटण दाबले. शिंदेसेनेने १०६ उमेदवार उभे केले होते. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली. ७लाख ४ हजार ९४६ वेळा धनुष्यबाणाचे बटण दाबले आहे. तर मशालीला १ लाख ९८ हजार ३०५ वेळा पसंती मिळाली आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदेसेना यानंतर सर्वाधिक ८३ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. परंतु, अपक्षांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. एका प्रभागात अपक्ष विजयी झाला आहे. अपक्षांना ५२ हजार ९७४ मतांचा प्रतिसाद मिळाला आहे. मनसेने २५ जागा लढल्या असून, त्यांच्या रेल्वे इंजिनला ६३ हजार ६३७एवढी मते मिळाली आहेत. राष्ट्रबादीला (अजित पवार) २६ हजार २६ व राष्ट्रवादीला (शरद पवार) ५२ हजार ५०५ एवढी मते मिळाली आहेत. या व्यतिरिक्त इतर पक्षांना प्रतिसाद मिळाला नाही.
| पक्ष / गट | उमेदवार संख्या | मिळालेली एकूण मते |
| भाजप | - | ९,४०,०६६ |
| शिवसेना (एकनाथ शिंदे) | १०६ | ७,०४,९४६ |
| शिवसेना (उद्धव ठाकरे) | ५६ | १,९८,३०५ |
| मनसे | २५ | ६३,६३७ |
| राष्ट्रवादी (शरद पवार) | ८३ | ५२,९७४ |
| अपक्ष उमेदवार | ८३ | ५२,५०५ |
| राष्ट्रवादी (अजित पवार) | २६ | २६,०९६ |
| वंचित बहुजन आघाडी | १८ | - |
| काँग्रेस | - | १५,६७८ |
| आम आदमी पार्टी (AAP) | १४ | ३,२७८ |
| जनता दल सेक्युलर | ४ | २,४४७ |
| समाजवादी पार्टी | ३ | २,०५५ |
| बहुजन समाज पक्ष (BSP) | ६ | १,८४५ |
| रिपब्लिकन सेना | - | १,७२३ |
| आरपीआय (एठवले) | २ | १,२३५ |
| BRSP | ३ | ६२४ |
| राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) | - | - |
| PPAI (डे.कै.) | - | - |