आयारामांना उमेदवारी देण्यावरून भाजपात फटाके; संघ स्वयंसेवकांच्या शोकसभेत बंडाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 14:38 IST2025-12-28T14:17:48+5:302025-12-28T14:38:07+5:30
Navi Mumbai Municipal Corporation election: घराणेशाही राबविणाऱ्यांना उमेदवारी देण्यास विरोध करून जय श्रीरामची घोषणाबाजी

आयारामांना उमेदवारी देण्यावरून भाजपात फटाके; संघ स्वयंसेवकांच्या शोकसभेत बंडाचा इशारा
Navi Mumbai Municipal Corporation election: लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील माजी नगरसेवकांसह त्यांच्या कुटुंबीयाना उमेदवारी देण्यावरून आता शिस्तप्रिय म्हणवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजप कार्यकर्त्यात फटाके फुटू लागले आहे. शनिवारी सानपाड्याच्या वडार भवनातील संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका शोकसभेतच प्रभाग १८ मधून घराणेशाही राबविणाऱ्यांना उमेदवारी देण्यास विरोध करून जय श्रीरामची घोषणाबाजी केली.
शुक्रवारी सकाळी सानपाडा येथील संघाचे स्वयंसेवक विक्रम मिश्रा यांची शोकसभा आयोजिली होती. सभेत संघ आणि भाजपचे पाचशे ते सहाशे कार्यकर्ते उपस्थित होते. ती सुरू असतानाच सानपाडा प्रभाग १८ मधून माजी नगरसेवक दशरथ भगत यांच्यासह त्यांच्या घरातील सदस्यांना तिकिटे देण्यात येत असल्याचे वृत्त धडकल्याने कार्यकर्त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला.
नाराजी नाट्य सुरू
१.संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश निकम यांनी ज्या लोकांनी राम मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर आनंद व्यक्त केला नाही, त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली.
२. दुसरे कार्यकर्ते अँड. रमेश त्रिपाठी यांनी तर दशरथ भगत यांच्या घरात पाच ते सहा तिकिटे दिल्याचा आरोप केला. सानपाडा-वाशीत संघाचा विचार आम्ही रुजविला आहे. त्यामुळे भगत यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली.
३.वाशी-सानपाड्यात अनिल कौशिक, शार्दुल कौशिक यांच्यासह नवी मुंबईतील इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते आले आहेत. मात्र, त्यांनी भाजपची विचारणी अंगिकारली आहे. त्यामुळे भगत यांच्या उमेदवारीस विरोध असल्याचे त्रिपाठींसह उपस्थित संघ स्वयंसेवकांनी सांगितले.