मतदारांना दिसतील रंगीत मतपत्रिका; एकूण ३ मते द्यावी लागणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:34 IST2026-01-01T14:33:51+5:302026-01-01T14:34:38+5:30
मतदारांना मतदान करताना अडचणी येऊ नयेत म्हणून अ, ब, क, ड अशा प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र रंगांच्या मतपत्रिका असणार आहेत.

मतदारांना दिसतील रंगीत मतपत्रिका; एकूण ३ मते द्यावी लागणार...
- नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई वगळता राज्यभरातील महापालिकांमध्ये यावेळी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका होत आहेत. निवडणुका अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टिकोनातून मतदारांसाठी रंगीबेरंगी मतपत्रिका ठेवण्याचा नवा उपक्रम राबविण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मतदारांना मतदान करताना अडचणी येऊ नयेत म्हणून अ, ब, क, ड अशा प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र रंगांच्या मतपत्रिका असणार आहेत. 'अ' जागेसाठी पांढऱ्याच्या, 'ब' जागेसाठी फिकट गुलाबी, 'क' जागेसाठी फिकट पिवळा, आणि 'ड' जागेसाठी फिकट निळा रंग असणार आहे.
'एक जागा, एक मत'
मतदानाच्या प्रक्रियेत मतदारांनी कोणत्याही जागेसाठी फक्त एकच मत देणे आवश्यक आहे. 'एक जागा, एक मत' या सूत्रानुसार मतदारांनी अ, ब, क, ड जागांपैकी प्रत्येकी एक उमेदवार निवडावा लागणार आहे. चारही जागांसाठी बटणे दाबून मतदान केल्यानंतर, शेवटी 'बीप' असा आवाज येईल जो मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची खात्री देईल. मतदारांना त्यांचा उमेदवार नको असल्यास 'नोटा' या पर्यायाचा उपयोग करता येईल.
नव्या पद्धतीमुळे मतदान प्रक्रिया अधिक सुलभ होईल, तसेच मतदारांचा गोंधळ उडणार नाही, अशी अपेक्षा आहे. महापालिका निवडणुकांचे हे रंगीत चित्र लवकरच मतदारांच्या समोर येणार आहे आणि यामुळे निवडणुकीत नवी रंगत भरणार आहे.
बहुसदस्यीय पद्धती
प्रत्येक नवी मुंबईकराने यावेळी पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावावा.
१ ते २७ क्रमांकाच्या प्रभागातील नागरिकांनी अ, ब, क, ड या प्रत्येक जागेसाठी प्रत्येकी १ या प्रमाणे एकूण ४ मते तसेच प्रभाग क्रमांक २८ मधील नागरिकांनी अ, ब, क या ३ जागांमधील प्रत्येक जागेसाठी प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण ३ मते द्यावीत असे आवाहन महापालिकेने केले आहे.