नवी मुंबई, उल्हासनगरात महायुती फिस्कटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:24 IST2025-12-30T13:24:12+5:302025-12-30T13:24:39+5:30
भाजपने नवी मुंबईत शिंदेसेनेला फक्त २० जागा देण्याची तयारी दाखवत जागा वाटपात ताठर भूमिका घेतल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई, उल्हासनगरात महायुती फिस्कटली
नवी मुंबई : शिंदेसेना व भाजपामध्ये सुरू असलेली युतीची चर्चा अखेर फिस्कटली आहे. भाजपने नवी मुंबईत शिंदेसेनेला फक्त २० जागा देण्याची तयारी दाखवत जागा वाटपात ताठर भूमिका घेतल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई भाजप व शिंदेसेनेमध्ये चुरस आहे. दोघांनीही स्वबळाची तयारी सुरू केली होती. युतीसाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जागा वाटपासाठी दोन बैठका घेतल्या. शिंदेसेनेकडे ५५ व भाजपकडे ५६ माजी नगरसेवक आहेत. यापूर्वीच्या नगरसेवकांच्या जागा ज्या-त्या पक्षांना सोडव्यात, असा आग्रह शिंदेसेनेचा होता. जागा वाटपाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होत होत्या. परंतु भाजपने फक्त २० जागा सोडण्याची तयारी दर्शविल्यामुळे अखेर युती तुटली आहे. युती तुटली हे अधिकृत जाहीर न करता दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दाेन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.