जागावाटपाच्या स्वार्थात सर्वच पक्षांना जाहीरनाम्यांचा विसर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 07:42 IST2026-01-02T07:42:10+5:302026-01-02T07:42:33+5:30
यामुळे जनतेच्या समस्यांचा सर्वच पक्षांना जागावाटपाच्या स्वार्थात विसर पडल्याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. जागावाटपाच्या वादांमध्ये सर्व राजकीय पक्ष व्यस्त होते.

जागावाटपाच्या स्वार्थात सर्वच पक्षांना जाहीरनाम्यांचा विसर?
नारायण जाधव -
नवी मुंबई : निवडणुकीत कोणत्या विकास कामांना प्राधान्य देणार, कोणते प्रकल्प आणणार आणि कोणत्या समस्या सोडवणार हे सांगून मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष जाहीरनाम्यांचा आधार घेतात; मात्र या पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण होऊनदेखील मुंबई महानगर प्रदेशातील नऊ महापालिकांत एकाही पक्षाने किंवा महायुती-महाविकास आघाडीने त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध केलेले नाहीत.
यामुळे जनतेच्या समस्यांचा सर्वच पक्षांना जागावाटपाच्या स्वार्थात विसर पडल्याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. जागावाटपाच्या वादांमध्ये सर्व राजकीय पक्ष व्यस्त होते. ही प्रक्रिया संपून आता सर्व पक्षांनी उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या छाननीनंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे; मात्र यात कोणते मुद्दे घेऊन पक्ष प्रचार करणार याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याचे चित्र आहे.
हे मुद्दे येतील काय?
पाणीटंचाई, वाहतूककोंडी, तोकडी आराेग्य व्यवस्था, फेरीवाले, सार्वजनिक वाहतूक सुविधेसह अनधिकृत बांधकामे, प्रदूषण, या समस्या सर्वत्र आहेत. वायू प्रदूषण, खड्डे, होर्डिंगवरून न्यायालयाने सरकार आणि पालिकांना धारेवर धरले होते. हे मुद्दे तरी वचननाम्यात उमटतील काय, असा प्रश्न केला जात आहे.
विकासाचा अर्थ नागरिकांच्या आनंदात वाढ करणे हादेखील असल्याने सर्वच पक्ष हॅप्पीनेस इंडेक्स वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत का, प्रचार मोहिमेत कोणते मुद्दे मांडले जातील याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.