The citadel of Pancreas in Peacap's neighborhood is in a shambles | शेकापचा पनवेलमधील बालेकिल्ला ढासळतोय

शेकापचा पनवेलमधील बालेकिल्ला ढासळतोय

- वैभव गायकर


पनवेल : एकेकाळी पनवेलमध्ये केवळ शेतकरी कामगार पक्षाचा वरचष्मा होता. मात्र, मागील दशकापासून ही परिस्थिती बदलत चालली आहे. सलग दोन वेळा विधानसभा त्यानंतर महानगरपालिका आणि आता लोकसभेत आघाडीच्या उमेदवारांनी खालेला सपाटून मार पाहता, शेकापचा पनवेलमधील बालेकिल्ला ढासळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार रिंगणात उतरल्यामुळे मावळच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. मतदारांनी श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्य देऊन पसंती दिली. २०१४ मध्ये शेकापला पनवेलमधून तब्बल १४ हजारांची लीड पनवेलकरांनी दिली होती. त्या वेळची मोदीलाटही प्रचंड होती. मात्र, १४ हजारांची लीड तोडून आता युतीला तब्बल ५४ हजारांची ऐतिहासिक लीड मिळाली आहे.


शेकापला आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या मतांचा फटका कधीच बसला नव्हता. पनवेलमधील ग्रामीण भागात शेकापची पकड मजबूत असली मात्र, शहरी मतदारांनी शेकाप आघाडीला नाकारले आहे. महापालिकेच्या निवडणुकीतदेखील असेच चित्र पाहावयास मिळाले होते.


मावळ मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव आमदार असलेल्या कर्जतमध्ये जेमतेम पार्थ यांना दोन हजारांचे मताधिक्य मिळाले, तर शिवसेनेचा आमदार असलेल्या उरण मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित ताकदीमुळे खासदार श्रीरंग बारणे यांना केवळ तीन हजारांचे मताधिक्य मिळाले. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मागणीनुसार पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, पनवेलमधील मतांच्या समीकरणात अचानकपणे झालेला बदल पाहता शेकापगोठात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

शरद पवारांच्या सभेचा परिणाम नाही
पार्थ यांच्या प्रचारार्थ पनवेलमधील खारघर शहरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली होती. मात्र, या सभेचाही कोणताच परिणाम मतदारांवर झाला नाही, उलट पनवेलमधील ४४ हजारांच्या आघाडीत तब्बल १६ हजारांची आघाडी बारणे यांना खारघर शहरातून मिळाली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शेकापचा कस
लागणार आहे.

Web Title: The citadel of Pancreas in Peacap's neighborhood is in a shambles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.