ऐरोली मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा रोड शो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 23:55 IST2019-10-15T23:55:02+5:302019-10-15T23:55:30+5:30
दुचाकी रॅली : कोपरखैरणे, घणसोलीतील समर्थकांकडून स्वागत

ऐरोली मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा रोड शो
नवी मुंबई : ऐरोली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. वाशी ते दिघा दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत महायुतीतील घटकपक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ऐरोली मतदारसंघातून माजी मंत्री गणेश नाईक भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. मागील विधानसभा निवडणुकी वेळी झालेला गाफीलपणा यंदा टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न नाईक परिवार व त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या प्रचाराला अधिक प्रभावी करण्यासाठी विजयी संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वाशी सेक्टर १४ येथील एमजीएम कॉम्प्लेक्स येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली.
या वेळी प्रचाररथामध्ये मुख्यमंत्र्यांसह गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महापालिकेतील विरोधीपक्ष नेते विजय चौगुले, माथाडी नेते नरेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर आदी उपस्थित होते. वाशीतून सुरू झालेल्या रॅलीचे कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली येथे जमलेल्या समर्थकांनी स्वागत केले. त्यानंतर दिघा येथे रॅलीचा शेवट करण्यात आला.