युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 06:39 IST2025-12-27T06:39:06+5:302025-12-27T06:39:22+5:30
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता तीनच दिवस शिल्लक आहेत.

युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
नवी मुंबई : भाजप व शिंदेसेना यांच्यामधील युतीच्या चर्चा जवळपास फिस्कटल्याचीच चर्चा शहरात सुरू झाली आहे. यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता असून, बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्राधान्य देणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे निश्चित झाले असून, जागा वाटपही अंतिम टप्प्यात आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता तीनच दिवस शिल्लक आहेत. परंतु, अद्याप महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी उमेदवारीची घोषणा केलेली नाही. सत्तेसाठी प्रमुख स्पर्धा असणाऱ्या शिंदेसेना व भाजपमध्ये चर्चेच्या दोन बैठका झाल्या आहेत. परंतु, जागा वाटपावरून एकमत झालेले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वबळाच्या दिशेने वाटचाल सुरू केली असली तरी अनेक विभागात इच्छुकांची संख्या जास्त आहे.
उमेदवार निश्चित करण्यासाठी अर्जांची छाननी अंतिम टप्प्यात आहे. उमेदवारी निश्चित करून योग्य वेळी अर्ज भरण्यास प्राधान्य दिले जाईल.
विजय नाहटा, उपनेते शिंदेसेना
मविआ उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करण्यात येत आहे. यासाठी सर्व घटक पक्षांच्या बैठका सुरू आहेत.
प्रवीण म्हात्रे, जिल्हाप्रमुख उद्धवसेना
मविआ पदाधिकाऱ्यांमध्ये उत्तम समन्वय आहे. कोणी किती जागा लढायच्या व कोणत्या जागा लढायच्या हेही निश्चित होत आले आहे.
गजानन काळे, शहर प्रमुख मनसे