'विमानतळामुळे नवी मुंबई, पनवेल देशाचे ग्रोथ इंजिन, राज्याच्या 'जीडीपी'त एक टक्क्याने वाढ'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 06:07 IST2026-01-13T06:06:27+5:302026-01-13T06:07:11+5:30
नवी मुंबई विमानतळामुळे नवी मुंबई, पनवेल, नैना व तिसरी मुंबई हे भविष्यातील ग्रोथ इंजिन असेल

'विमानतळामुळे नवी मुंबई, पनवेल देशाचे ग्रोथ इंजिन, राज्याच्या 'जीडीपी'त एक टक्क्याने वाढ'
मुंबई विमानतळावरील केवळ एका रन-वेमुळे लैंडिंग करता येत नसल्यामुळे १ टक्के जीडीपी थांबला होता. तो जीडीपी नवी मुंबई विमानतळामुळे वाढेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नवी मुंबई विमानतळामुळे नवी मुंबई, पनवेल, नैना व तिसरी मुंबई हे भविष्यातील ग्रोथ इंजिन असेल, असे म्हणाले.
भाजपने 'व्हिजन २०३०' या संकल्पनेवर आधारित 'काय म्हणता पनवेलकर' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी विविध प्रश्नांवर फडणवीस बोलले. तर नवी मुंबईत ऐरोली येथे त्यांची जाहीर सभा झाली.
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला 'दिबां'चे नाव देण्याचा पुनरुच्चार करून नाव देण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे फडणवीस यांनी दोन्ही ठिकाणी सांगितले. पनवेल महापालिकेत करवाढीचा मुद्दा गाजत आहे. विरोधकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ५००च्या स्टॅम्प पेपरवरील मालमत्ता करात ६५ टक्के सुटीचे अॅफिडेव्हिट हे फसवे असून, पनवेलकर त्याला भुलणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी व्यक्त केला.
कळंबोली येथे बायोपिकविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भविष्यात माझा बियोपिक आला तर आपला 'देवा भाऊ' हे नाव असावे. घरी संगीतावर चर्चा होते. मला हजारो गाणी पाठ आहेत. मी बेसुरा आहे, अशी अमृता बोलते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नवी मुंबई, पनवेलचा पाणीप्रश्न सुटेल
न्हावा शेवा टप्पा ३ प्रकल्पामुळे पनवेलचा पाणीप्रश्न सुटेल. तसेच भविष्यात नवी मुंबई शहरासह पनवेल परिसराचा पाण्याचा प्रश्न २०५० पर्यंत मार्गी लावण्याकरिता शिलार आणि पोशीर या धरण उभारणी करण्यात येणार आहे. याकरिता टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.