सर्वपक्षीय नेत्यांकडून बंडोबांना थंड करण्यासाठी आश्वासनांची खैरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:55 IST2026-01-02T12:54:34+5:302026-01-02T12:55:08+5:30
नेत्यांकडून मनधरणी सुरू, आज अर्ज माघारीनंतर होणार पालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट

सर्वपक्षीय नेत्यांकडून बंडोबांना थंड करण्यासाठी आश्वासनांची खैरात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: महापालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी २ जानेवारीपर्यंत मुदत आहे. यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी काहींना भविष्यात चांगली पदे देण्याचे आश्वासन दिले जात असून, काहींना वरिष्ठ नेते स्वतः फोन करत असल्याचे पाहावयास मिळाले. ज्यांचे तिकीट कापले ते दुसऱ्या दिवशीही टीका करीत होते. यामुळे आता कोण माघार घेणार व कोण निवडणूक रिंगणात राहणार, हे शुक्रवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.
उमेदवार निवडीवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी तिसऱ्या दिवशीही सुरूच असल्याचे दिसले. नेरूळमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवार मंगल घरत यांनी समाजमाध्यमांवर व्हिडिओ टाकून नाराजी व्यक्त केली. आयाराम-गयाराम यांचे स्वागत करून निष्ठावंतांवर अन्याय होत असल्यास अपक्ष लढून ताकद दाखवू, असा इशारा त्यांनी दिला आहे. जुईनगर, वाशीमध्येही भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. शिंदेसेनेतही ऐरोली, सानपाडा, नेरूळमध्ये बंडखोरी झाली असून, अनेकांनी अपक्ष अर्ज सादर केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, निवडणूक प्रमुख, माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार निरंजन डावखरे यांनी बंडखोरांना फोन करून स्वीकृत नगरसेवक आणि महामंडळाचे गाजर दाखविल्याचे समजते.
अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न
वाशीतील एक दिग्गज माजी नगरसेवकाला भाजपच्या आमदार व इतर वरिष्ठ नेत्यांनीही अर्ज मागे घेण्याची विनंती केल्याची चर्चा आहे. इतर ठिकाणीही अर्ज मागे घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
निवडणूक रिंगणात सद्यःस्थितीमध्ये २ १११ जागांसाठी ८३९ अर्ज आहेत. यात वाशीत शेवटच्या दिवशी यामधील किती अर्ज मागे घेतले जाणार, याकडेही लक्ष लागले आहे.
ज्यांचे एकापेक्षा जास्त अर्ज आहेत, 3 तेही कमी होऊन त्यांचा एकच अर्ज राहणार आहे. यामुळे प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात किती जण राहणार, याविषयी उत्सुकता आहे.
आघाडी आज घोषणा करणार
महाविकास आघाडीमध्येही उद्धवसेना, काँग्रेस, मनसे यांचे काही प्रभागात एकमेकांविरोधात अर्ज भरले आहेत. शेवटच्या क्षणी हा गोंधळ झाला आहे. आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी कोणाचे अर्ज मागे घ्यायचे, हे निश्चित केले आहे. शुक्रवारी अर्ज माघारीनंतर आघाडीच्या सर्व पक्षांची अधिकृत यादी जाहीर केली जाणार आहे.
स्वीकृत सदस्यासह परिवहनचीही संधी
काही ठिकाणी बंडखोरांची ताकद आहे. ते निवडणूक रिंगणात राहिले तर पक्षाच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यताही आहे.
यामुळे काहींना स्वीकृत सदस्य तर काहींना परिवहनसह महामंडळावर सदस्य म्हणून संधी दिली जाण्याचे आश्वासन दिले जात आहे. काही ठिकाणी ताकद नसलेल्या अपक्षांशी संपर्कच केला जात नाही.
एबी फॉर्म नसलेले आता अपक्ष
अनेकांनी पक्षाचा एबी फॉर्म नसतानाही व तिकीट दिलेले नसतानाही पक्षाच्या नावाने अर्ज भरला आहे. अशांची संख्या भाजप व शिंदेसेनेत जास्त आहे. त्यांचे अर्जही वैध ठरले आहेत. हे सर्व आता अपक्ष म्हणून गृहीत धरले जाणार आहेत.