सिडकोच्या अधिसुचनेला ९२५ शेतकऱ्यांनी नोंदविल्या हरकती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 19:47 IST2024-01-04T19:47:34+5:302024-01-04T19:47:43+5:30
संतप्त शेतकऱ्यांची सिडको भवनावर धडक

सिडकोच्या अधिसुचनेला ९२५ शेतकऱ्यांनी नोंदविल्या हरकती
मधुकर ठाकूर
उरण : सिडकोच्या जमिनी संपादित करण्याच्या अधिसुचनेचा निषेध करुन गुरुवारी (४) तालुक्यातील चाणजे, नागाव, केगाव, बोकडवीरा, पागोटे व फुंडे येथील गावातील ९२५ शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या असल्याची माहिती सिडको प्रकल्पग्रस्त घर व जमीन बचाव समितीचे संतोष पवार यांनी दिली.
उरण तालुक्यातील चाणजे, नागाव, केगाव, बोकडवीरा, पागोटे व फुंडे येथील गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनासाठी सिडकोने विकासाच्या नावाखाली पुन्हा एकदा सुधारित अधिसूचना काढली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही सिडकोच्या या अधिसूचनेमुळे मात्र पुन्हा संतापाची लाट उसळली आहे .शेतकऱ्यांच्या तातडीने सोमवारी (२५) बोलाविण्यात बैठकीत ४ जानेवारी रोजी सिडको भवनावर हरकती व निषेध नोंदविण्यासाठी आंदोलनाचा इशारा सिडको प्रकल्पग्रस्त घर व जमीन बचाव समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दिला होता.
गुरुवारी (४) उरण तालुक्यातील चाणजे, नागाव, केगाव, बोकडवीरा, पागोटे व फुंडे येथील हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सिडकोच्या प्रशासन भवनावर धडक दिली.समितीचे भुषण पाटील, सुधाकर पाटील, संतोष पवार, काका पाटील, अरविंद घरत, महेश म्हात्रे, चेतन गायकवाड, मधुसूदन म्हात्रे, ॲड.दिपक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी सिडकोच्या जमिनी संपादन करण्यास कडाडून विरोध दर्शविला.सिडकोचा निषेध करुन ९२५ शेतकऱ्यांनी अधिसुचनेला विरोध केला.सिडकोच्या भु-संपादन अधिकारी डॉ.वारीकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संमती दिलेल्या शेतकऱ्यांची जमीन संपादन केली जाईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती समितीचे संतोष पवार यांनी दिली.