नवी मुंबईत २२६ कोट्यधीश रिंगणात; गवते कुटुंबीय ३०६ कोटींचे धनी, संतोष शेट्टी १०० कोटी, तर शिंदेसेनेचे किशोर पाटकर ९३ कोटींचे मालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 09:53 IST2026-01-05T09:53:40+5:302026-01-05T09:53:57+5:30
Navi Mumbai Municipal Corporation Election 2026: नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेना व भाजपामध्ये सत्ता मिळविण्यासाठी रस्सीखेच आहे.

नवी मुंबईत २२६ कोट्यधीश रिंगणात; गवते कुटुंबीय ३०६ कोटींचे धनी, संतोष शेट्टी १०० कोटी, तर शिंदेसेनेचे किशोर पाटकर ९३ कोटींचे मालक
- नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली असून उमेदवार निवडताना सामाजिक कामांबरोबर आर्थिक स्थितीचाही विचार केला आहे. ४९९ उमेदवारांपैकी तब्बल २२६ उमेदवार करोडपती आहेत. काँग्रेसचे संतोष शेट्टी १०० कोटीचे मालक असून त्यांच्या नंतर शिंदेसेनेचे किशोर पाटकर यांच्याकडे ९३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. जवळपास सर्वच प्रमुख पक्षांसह अपक्षही कोट्यधीश असल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामधील माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेना व भाजपामध्ये सत्ता मिळविण्यासाठी रस्सीखेच आहे. महाविकास आघाडी दुभंगली असली तरी सत्तेतील दोन्ही प्रमुख पक्षांना धक्का देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाणार आहे. यामुळे सर्वांनी उमेदवार निवडतानाही सामाजिक व आर्थिक बाबीकडेही लक्ष दिले आहे. यामुळे प्रत्येक पक्षांमध्ये कोट्यधीशांचा सर्वाधिक भरणा आहे. उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरताना सोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधील मालमत्तांचे आकडे पाहून सर्वसामान्यांना भोवळ येण्याचीच बाकी आहे.
संतोष शेट्टी
१००
किशोर पाटकर
९३
रवींद्र इथापे
७५
नामदेव भगत
५६
मंदाकिनी म्हात्रे
नेत्रा शिर्के
३७
सुरेश शेट्टी
२५
शशिकांत राऊत
२४
भरत भोईर
२८
एम. के. मढवी
२४
सर्वाधिक संपत्ती असणारे उमेदवार (आकडे कोटींमध्ये)
गवते कुटुंबीय ३०६ कोटींचे धनी
मनपा निवडणुकीमध्ये दिघा परिसरातून नवीन गवते, अपर्णा गवते हे दाम्पत्य व त्यांच्या कुटुंबातील दीपा गवते याही निवडणूक लढवत आहे. गवते कुटुंबीय हे मूळ दिघा गावातील रहिवासी आहेत. एमआयडीसीत त्यांची वडिलोपार्जित मोठी सामायिक जमीन आहे. गवते कुटुंबीयांची सामायिक संपत्तीची किंमत ३०६ कोटी एवढी असल्यामुळे या कुटुंबातील उमेदवार सर्वात श्रीमंत ठरले आहेत.
तब्बल ५१ स्कूल बस मालकीच्या
निवडणुकीपूर्वी काँग्रेसला घरघर लागली व एक वगळता उरलेले ९ माजी नगरसेवक इतर पक्षांमध्ये गेले. यानंतरही सर्व उमेदवारांमध्ये काँग्रेसचे संतोष शेट्टी हेच सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्याकडे तब्बल १०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांचा स्कूल बसचा व्यवसाय असून त्यांच्याकडे तब्बल ५१ बस असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रामध्ये आहे.
शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांच्याकडे ९३ कोटी, भाजपाचे रवींद्र इथापे यांच्याकडे ७५ कोटी, माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांच्याकडे ४४ कोटी, नेत्रा शिर्के यांच्याकडे ३७ कोटी व शिंदेसेनेचेच नामदेव भगत यांच्याकडे ५६ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा उल्लेख आहे. जवळपास ३१ उमेदवारांकडे १० कोटी पेक्षा जास्त मालमत्ता आहे. फारशी मालमत्ता नसलेल्याही अनेकांना काही ठिकाणी उमेदवारी दिली आहे. याशिवाय १० ते २० कोटींची मालमत्ता असलेल्या उमेदवारांची संख्याही मोठी असल्याने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होत आहे.