सहा केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 07:08 AM2019-04-12T07:08:21+5:302019-04-12T07:08:39+5:30

विदर्भासह देशातील ९१ मतदारसंघांत शांततेत मतदान. पहिला टप्पा : गडचिरोलीत नक्षलींनी घडवला स्फोट, कोणीही जखमी नाही; विदर्भात सरासरी ६२ टक्के मतदान.

future of the six Union Ministers is in EVM | सहा केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये झाले बंद

सहा केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये झाले बंद

Next

नागपूर : सूर्य आग ओकत असल्याने अंगाची लाहीलाही होत असतानाही विदर्भातील मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी विदर्भातील सात मतदारसंघात गुरूवारी सरासरी ६$२ ते ६४ टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दोन भू सुरूंग स्फोट घडवून आणले; सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, ट्रॅक्टर उलटून चार मतदारांचा अंत झाला.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहीर यांच्यासह काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, नाना पटोले, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भावना गवळी आदी दिग्गजांचे राजकीय भवितव्य गुरूवारी यंत्रबंद झाले. सकाळी मतदानासाठी गर्दी होती. दुपारी उन्ह वाढल्यावर मतदारांची संख्या कमी झाली आणि चारनंतर पुन्हा रांगा लागल्या.


याद्यांमधून नावे गहाळ झाल्याचा अनुभव याही वेळेस आला. काही ठिकाणी ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’ मशीनचा तांत्रिक घोळ झाल्याने मतदानाला विलंब झाला. पाच वाजेपर्यंत नागपूरमध्ये ५३.१३ टक्के तर रामटेकमध्ये ५१.७२ टक्के चंद्रपूरमध्ये ५५.९७ टक्के, वर्ध्यात ५३ टक्के, यवतमाळ-वाशिममध्ये ५३.७८ व भंडारा-गोंदियामध्ये ६०.५० टक्के मतदान झाले. सरासरी ७० टक्के मतदानाचा अंदाज वर्तविला जात आहे. राष्टÑवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल, खा. मधुकर कुकडे, आ. डॉ. परिणय फुके, आ. बाळा काशीवार, आ. चरण वाघमारे, आ. रामचंद्र अवसरे तसेच राष्टÑवादीचे उमेदवार नाना पंचबुध्दे तर भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

चंद्रपूर : २ गावांचा बहिष्कार
चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या दोन्ही गावांनी आज गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
नागपुरात ‘व्हीआयपी’ मतदारांचे मतदान
दरम्यान नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री व भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना उमेदवार व खा.कृपाल तुमाने, कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले, किशोर गजभिये यांनीदेखील मतदान केले. यावेळी मतदानकेंद्रांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात होती.

मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांचे हाल
लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे मतदारांमध्ये उत्साह असताना मतदानाची प्रक्रिया पार पाडणाºया कर्मचाऱ्यांचे मात्र हाल झाले. अनेक केंद्रात पाण्याच्या कॅन दुपारपूर्वीच संपल्या, तर काही केंद्रांमध्ये कर्मचाºयांना भर उन्हातच बसून काम करावे लागले.

देशात सरासरी ६६ टक्के मतदारांनी बजावला हक्क
१७व्या लोकसभेसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडले. या सर्व ठिकाणी मिळून सरासरी ६६ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान त्रिपुरा (८२ टक्के) येथे झाले. पश्चिम बंगालमध्ये ८१ टक्के तर नागालँड व मणिपूर येथे ७८ टक्के मतदान झाले. बिहारमध्ये ५0 टक्के मतदान झाले. मतदानातून सहा केंद्रीय मंत्र्यांसह १२७९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले आहे. या सर्व ठिकाणची मतमोजणी २३ मे रोजी होईल.
आंध्र प्रदेश व जम्मूच्या काही भागांत ईव्हीएमबद्दल अनके तक्रारी आल्या. जम्मूमध्ये ईव्हीएमवरील हाताच्या चिन्हासमोरील बटण दाबता, मत कमळावर पडत असल्याचा आरोप मतदारांनी केला. त्याचा व्हिडीओच मेहबुबा मुफ्ती व ओमर अब्दुल्ला यांनी जारी केला.
आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस व तेलगू देसमचे दोन स्थानिक नेते हिंसाचारात मरण पावले. तेथील एका उमेदवाराने ईव्हीएम नीट काम करीत नसल्याने ते जमिनीवर फेकल्याने गोंधळ उडाला. कैराना मतदारसंघात आपल्याऐवजी मतदान अधिकारी परस्पर मतदान करीत असल्याच्या तक्रारी काही मतदारांनी केल्या. नॉयडामध्ये पोलिसांना जी खाद्यपाकिटे देण्यात आली, त्यावर नमो फुड्स असा शिक्का असल्याचे दिसून आले. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. पण त्यात कोणीही जखमी झाले नाही.
देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ९१ जागांसाठी गुरूवारी मतदान झाले. यात आंध ्र(२५), अरुणाचल (२), आसाम (५), बिहार(४), छत्तीसगड (१), जम्मू-काश्मीर (२), उत्तर प्रदेश (८), पश्चिम बंगाल (२), महाराष्टÑ (७) मेघालय (२), उत्तराखंड (५), मिझोरम (१), नागालॅण्ड (१), ओडिशा (४), सिक्कीम (१), मणिपूर (१), त्रिपुरा (१), तेलंगणा (१७) या राज्यांतील तसेच लक्षद्वीप (१) आणि अंदमान, निकोबार (१) यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचलप्रदेश आणि ओडिशा या विधानसभांसाठीही मतदान झाले.
हे प्रमुख रिंगणात
केंद्रीय मंत्री : महेश शर्मा (गौतम बुद्ध नगर), व्ही. के. सिंग (गाझियाबाद), किरेन रिजिजू (अरुणाचल पश्चिम), सत्यपाल सिंह (बागपत). विरोधी नेते : अजित सिंह (मुजफ्फरनगर), जयंत चौधरी (बागपत), डी. पुरंदेश्वरी (विशाखापट्टणम्), चिराग पासवान (जमुई), असदुद्दीन ओवेसी (हैदराबाद), रेणुका चौधरी(खम्मम), गौरव गोगोई (कालियाबोर).

Web Title: future of the six Union Ministers is in EVM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.