Warning warning to opponents | विरोधकांना सावधानतेचा इशारा देणारे निकाल
विरोधकांना सावधानतेचा इशारा देणारे निकाल

ठळक मुद्दे जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे.कोकाटे व पवार या दोघांच्याही बरोबरीचे मताधिक्य घेऊन गोडसे निवडून आले याचा अर्थ मतविभाजनाच्या नफानुकसानीचे अंदाज साफ कोसळले.भुजबळांच्या येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारास मताधिक्य लाभले. यावरून तेथील राजकीय हवेचा अंदाज बांधता यावा

लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे. विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्याकडे ‘मोदी फॅक्टर’ म्हणून पाहता येणारे असले तरी, त्याला सहज म्हणून घेता येऊ नये.
नाशिकमधूनहेमंत गोडसेदिंडोरी येथून डॉ. भारती पवार हे दोन्ही उमेदवार सुमारे दोन लाखांच्या फरकांनी निवडून आले आहेत. नाशिकमध्ये अठरा उमेदवार रिंगणात असले तरी प्रामुख्याने तिरंगी ते चौरंगी लढतीच्या अपेक्षा केल्या जात होत्या. दिंडोरीतही आठ उमेदवार होते, पण तिरंगी लढत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार असतानाही दोन लाखांचे मताधिक्य लाभावे, ही साधी बाब नाही. यात अंतिमत: पंतप्रधान मोदी यांचाच करिष्मा कामी आलेला असला तरी विरोधकांना, मग ते पक्ष असो की उमेदवार; आपल्याबद्दलची विश्वासार्हता निर्माण करता आली नसल्याचेच म्हणता यावे.
नाशकात अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा लाभ भुजबळ यांना तर वंचित आघाडीचे पवन पवार यांच्यामुळे घडून येणाºया मतविभाजनाचा फायदा गोडसे यांना होण्याची अटकळ बांधली जात होती; परंतु कोकाटे व पवार या दोघांच्याही बरोबरीचे मताधिक्य घेऊन गोडसे निवडून आले याचा अर्थ मतविभाजनाच्या नफानुकसानीचे अंदाज साफ कोसळले. का झाले असावे असे, तर लोकसभेसाठीच्या मोठ्या निवडणुकीत राजकीय पोकळी भरून काढू पाहणाºया पक्षांना अगर उमेदवारांना संधी न देण्याचीच अधिकतर मानसिकता मतदारांची असते. नाशकात तेच दिसून आले.
विशेषत: भुजबळांच्या येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारास मताधिक्य लाभले. यावरून तेथील राजकीय हवेचा अंदाज बांधता यावा जो आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरावा.
लोकसभेची व विधानसभेची गणिते वेगवेगळी असतात हे खरे असले तरी, लोकभावनांकडे दुर्लक्ष करता येऊ नये एवढा धडा तरी या निकालातून नक्कीच घेता यावा. कारण, ज्या पद्धतीने लोकसभेसाठी प्रचाराचे रण माजलेले दिसून आले त्याचीच पुनरावृत्ती तेव्हा होणे निश्चित आहे.

की फॅक्टर काय ठरला?
गोडसे यांच्याकडे पूर्णवेळ खासदार म्हणून बघितले गेले. आजपर्यंत खासदारकी भूषविलेल्या अन्य मान्यवरांनी पक्षातील जबाबदाऱ्यांसह अन्य सहकारी संस्थामध्येही आपली खुर्ची शाबूत ठेवून खासदारकी राखली होती. गोडसे यांनी अन्य संस्थांमध्ये मन न गुंतविल्याने त्यांचे विरोधक कमी होते.
नाशकात छगन भुजबळ यांच्याबद्दल जशी सहानुभूतीची भावना व्यक्त होते तशी परिस्थिती समीर यांच्याबाबत नाही. भुजबळांना मध्यंतरी कारागृहात राहावे लागल्याने पक्ष संघटना खिळखिळी झाली आहे. त्याचा लाभ समोरच्या उमेदवारास आपसूक झाला.
भारती पवार यांनी राष्ट्रवादीतून येऊन भाजपची उमेदवारी घेतली असली आणि विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी डावलली गेली  असली तरी, चव्हाण उघडपणे विरोधाची भूमिका घेऊ शकले नव्हते. शिवाय, चव्हाण यांच्यासाठी पक्षाशी विद्रोह करणे स्वत:च्याच पायावर कुºहाड पाडून घेणारे ठरु शकते हे जाणून पक्षनेते प्रामाणिकपणे राबले.

Web Title:  Warning warning to opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.