174 गावांत केवळ एक गणपती : पोलिसांनी घातली साद; नाशिककर ग्रामस्थांनी दिली साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 23:43 IST2020-08-23T23:40:36+5:302020-08-23T23:43:48+5:30
नाशिकच्या ग्रामीण भागात केवळ 324 सार्वजनिक मंडळांकडून 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच 174 गावांनी 'एक गाव एक गणपती'चा नियम पाळला आहे.

174 गावांत केवळ एक गणपती : पोलिसांनी घातली साद; नाशिककर ग्रामस्थांनी दिली साथ
नाशिक - यंदा देश कोरोना महामारीचा मुकाबला करत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. यामुळे शासनाकडून गणेशोत्सवाच्या सार्वजनिक स्वरूपावर मर्यादा घालत साधेपणाने उत्सव साजरा करण्यावर भर देण्याचे आवाहन केले गेले. पोलीस प्रशासन नियमांची अंमलबजावणी करण्याकरिता प्रयत्नशील असून नागरिकांना विश्वासात घेत जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक कार्यालयाने साद घातली अन गावकऱ्यांनी उत्कृष्टरीत्या त्यांना साथ दिली. यंदा नाशिकच्या ग्रामीण भागात केवळ 324 सार्वजनिक मंडळांकडून 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच 174 गावांनी 'एक गाव एक गणपती'चा नियम पाळला आहे.
नाशिक जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडादेखील 30 हजारापार रविवारी गेला. यामध्ये ग्रामीण भागात अद्याप 7 हजार 433 रुग्ण विविध गावांमध्ये आढळून आले आहेत. गणेशोत्सव साजरा होत असताना कोरोनाचे संक्रमण अधिक फोफावत जाऊ नये, यासाठी शासनाने कोविड-१९ कोरोणा विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी काही मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक जाहीर केले. यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सर्व अपर पोलीस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची संयुक्त बैठक घेत विविध तालुक्यातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, कार्यकत्यांच्या बैठका घेत कोरोणा विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक गावात 'एक गाव एक गणपती' बसविण्यासाठी आवाहन करण्याचा सूचना दिल्या. तशाप्रकारे जनजागृती करण्यात आल्याने नाशिक ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गतवर्षी २ हजार ८४० मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापणा केली होती. मात्र नाशिक ग्रामीण पोलीसांच्या आवाहानाला प्रतिसाद देत यावर्षी 324 सार्वजनिक मंडळे व 174 गावांमध्ये एक गांव एक गणपती अशा प्रकारे सर्व तालुके मिळून केवळ ४९६ गणेश मंडळांना सार्वजनिकरित्या शासकिय नियमांचे पालन करीत श्रींची स्थापना करण्याची ऑनलाइन परवानगी दिली गेली आहे, अशी माहिती विशेष शाखेकडून देण्यात आली.
येत्या 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती विसर्जन मिरवणुकांना कोणतीही परवानगी कोणालाही देण्यात आलेली नाही, त्यामुळे गणरायाला वाजतगाजत निरोप न देता शांतपणे शासनाच्या नियमांचे पालन करत निरोप दयावा असे आवाहन सिंह यांनी केले आहे.
कायदासुव्यवस्था टिकवण्यासाठी चोख बंदोबस्त
यंदा गणेशोत्सव व मुहर्रम हे दहा दिवसीय सण सोबतच साजरे होत आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. गणेश मंडळांनी श्रींची घरगुती अथवा घराजवळ बनविण्यात आलेल्या कुंडातच विसर्जन करावे. कोणत्याही मंडळांनी स्थापना ठिकाणापासुन दुर अंतरावरील ठिकाणी गणेश विसर्जन करु नये. कोविड-१९ संसर्गाच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच योग्य ते शारीरिक अंतर राखावे व मास्कचा वापर करावा, अशा विविध सूचना पोलिसांनी केल्या आहेत.