The Nationalist Focus Expected | राष्टवादीची मोठ्या आघाडीची अपेक्षा फोल

राष्टवादीची मोठ्या आघाडीची अपेक्षा फोल

लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे तालुक्यातील उमेदवार असल्याने अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना आघाडी मिळाली मात्र पन्नास हजारापेक्षा जास्त आघाडी मिळण्याच्या अपेक्षा फोल ठरल्या असून, भाजपच्या उमेदवार भारती पवार यांनी पूर्व भागात चांगली मते मिळवत आघाडी कमी केली तर माकपानेही दिंडोरीत चांगलीच मुसंडी मारली आहे.
दिंडोरी लोकसभेत मोदी लाटेतही भाजप उमेदवाराला गेल्यावेळी चार हजाराच्या दरम्यान आघाडी मिळाली होती. यंदा शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले धनराज महाले यांना उमेदवारी दिल्याने व आमदार नरहरी झिरवाळ यांच्या मजबूत पकडीमुळे महाले यांना दिंडोरीतून मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा होती, मात्र माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी भाजपच्या उमेदवार पवार यांच्या प्रचाराची धुरा हाती घेत शिवसेना भाजपला खंबीर साथ दिल्याने राष्ट्रवादीचे मोठ्या आघाडीचे मनसुबे उधळले गेले. पेठ तालुका व दिंडोरीच्या पश्चिम भागाने महाले यांना मोठी साथ दिली; मात्र पूर्व भागात शिवसेना भाजपचा दबदबा कायम राहिला. माकपाने यावेळी दिंडोरी मतदारसंघातून आपली मते वाढवली तर वंचित बहुजन आघाडीलाही चांगली मते मिळाल्याने राष्ट्रवादीच्या अपेक्षित मताधिक्याचे स्वप्न भंगले. दिंडोरी मतदारसंघातील आदिवासी पट्ट्यात मोदी लाटेचा प्रभाव दिसला नाही. पूर्व भागात पुन्हा मोदींचा करिष्मा दिसून आला. डॉ. भारती पवार यांच्या विजयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर भाजप व सेनेचे मनोबल वाढले आहे. प्रारंभीपासून नियोजनबद्ध प्रचार, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, मतदारसंघात वर्चस्व व प्रभाव असलेल्या व्यक्ती व गट यांच्याशी संपर्क, याबरोबरच सासरे ए.टी. पवार यांचा राजकीय वारसा याचा भारती पवार यांना फायदा झाला आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारीही पवार यांना विजयाच्या समीप घेऊन गेली. अंदाज चुकविणाऱ्या निकाला-मुळे धनराज महाले यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे.
या निवडणुकीचा काय परिणाम
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार भारती पवार या विजयी झाल्याने दिंडोरी विधानसभेसाठी भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आशा द्विगुणीत झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरी विधानसभेत आघाडी मिळवल्याने राष्ट्रवादीच्या गोटात काहीसे समाधान आहे. विधानसभेत काट्याची लढत होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. दिंडोरी विधानसभेत गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व रामदास चारोस्कर यांच्या लढती रंगल्या. या निवडणुकीत चारोस्कर यांनी पक्षप्रवेश न करता भाजपला साथ देण्याची भूमिका घेतल्यानंतर सद्या युतीच्या जागावाटपात दिंडोरी शिवसेनेकडे असून, ते आता काय भूमिका घेतात यावर राजकीय समीकरण तयार होणार आहे.  
तर माकप ने दिंडोरी मतदारसंघात यावेळी जास्तीचे मते घेतल्याने माकप ची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. युती आघाडी कायम राहिल्यास विद्यमान आमदार नरहरी झरिवाळ व माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्यात लढत होणार हे जवळपास निश्चित असणार आहे.

Web Title: The Nationalist Focus Expected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.