नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सवातून १३४ मंडळांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 16:53 IST2019-09-02T16:50:06+5:302019-09-02T16:53:38+5:30
१९२ मोठ्या मंडळांपैकी यंदा केवळ १५८ मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्याचप्रमाणे लहान मंडळांची संख्यादेखील ९७ने घटली असून यंदा ५०१ मंडळांची नोंद पोलिसांकडे झाली आहे.

नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सवातून १३४ मंडळांची माघार
नाशिक : विविध शासकिय नियम दिवसेंदिवस अधिकाधिक कठोर होत चालले असून दुसरीकडे महागाईमध्ये वाढ होऊ लागली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना परिसरातून मंडळांना मिळणारी देणगीचे स्वरूपही कमी झाल्याने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवातून तब्बल १३४ मंडळांनी माघार घेतली आहे. मागील वर्षी ८२९ लहान-मोठ्या मंडळांची संख्या होती. यंदा मात्र एकूण ६९५ मंडळांची पोलीस प्रशासनाच्या विशेष शाखेकडे नोंद झाली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह अन् आनंद तरूणाईचा गगणात मावेनासा असतो. तरूणाई मोठ्या आतुरतेने गणेशोत्सवाची वाट बघत असते. दरवर्षी तरूण मित्र मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सवात हिरहिरीने भाग घेतला जातो. विविध सामाजिक, राजकिय विषयांवरील प्रबोधनपर देखावे असो किंवा आकर्षक आरासची सजावट करून आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना मंडळांकडून करण्यात येते. यावर्षीदेखील तरूणाईचा उत्साह तितकाच असला तरीदेखील महागाईचे सावट अन् बाजारपेठेत आलेल्या आर्थिक मंदीचा फटका गणेशोत्सवाला बसत असल्याचे दिसून येत आहे. महागाई आणि शासकिय, प्रशासकीय नियमावली अधिकाधिक कडक होत चालल्यामुळे यावर्षी अद्याप ६९५ मंडळांनी गणेशोत्सवात सहभाग घेतला आहे. मागील वर्षी ही संख्या ८२९ इतकी होती. यंदा मौल्यवान मंडळे ३६ असून गेल्या वर्षी ३९ मंडळे होती. तसेच १९२ मोठ्या मंडळांपैकी यंदा केवळ १५८ मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्याचप्रमाणे लहान मंडळांची संख्यादेखील ९७ने घटली असून यंदा ५०१ मंडळांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. शहरात एकूण ६९५ मंडळांचा सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग आहे. मागील वर्षी ८२९ मंडळे सहभागी होती.
विधानसभा निवडणूक यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर असताना मंडळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंडळांना सौजन्य करणाऱ्या राजकीय लोकप्रतिनिधींकडून नव्याने मंडळांची स्थापना करण्यात येईल, असे वाटत होते; मात्र मंडळांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत घटली आहे. लहान मंडळांची संख्याही वाढलेली नाही.
पोलीस ठाणेनिहाय मंडळे अशी
पोलीस ठाणे | मौल्यवान | मोठे | लहान | एकूण |
---|---|---|---|---|
भद्रकाली | १० | ४२ | २८ | ८० |
मुंबईनाका | ०१ | ०६ | १९ | २६ |
सरकारवाडा | ०६ | ०४ | ३८ | ४८ |
पंचवटी | ०४ | १८ | ४१ | ६३ |
आडगाव | 00 | ०९ | २५ | ३४ |
म्हसरूळ | 00 | ०४ | ३२ | ३६ |
गंगापूर | ०१ | १८ | ३४ | ५३ |
सातपूर | ०३ | ११ | ४३ | ५७ |
अंबड | ०२ | ०३ | ९९ | १०४ |
इंदिरानगर | 00 | ०५ | ५० | ५५ |
उपनगर | ०२ | १२ | ४५ | ५९ |
ना.रोड | 00 | ११ | ३७ | ४८ |
दे.कॅम्प | 00 | ०७ | १५ | १० |
एकूण | ३६ | १५८ | ५०१ | ६९५ |