ठळक मुद्दे‘हम जो टकरायेगा, मिट्टी में मिल जायेंगा’ असा संदेशच जणू शत्रूंना दिलाबोफोर्स, सोल्टम, होवित्झर, वज्र या अत्याधुनिक तोफांसह मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर प्रहार

नाशिक : ठरविलेले ‘लक्ष्य’ निश्चित वेळेत अचूकरित्या भेदत तोफखान्याच्या ताफ्यातील मोर्टारपासून अत्याधुनिक ‘के-९ वज्र’पर्यंत सर्वच तोफा ‘ऑपरेशन विजय’मध्ये धडाडल्या. नाशिकच्यादेवळाली तोफखाना केंद्राचा गोळीबार मैदान मंगळवारी (दि.१४) युध्दजन्य सराव अभ्यास प्रात्याक्षिकांदरम्यान दणाणून निघाले. भारतीय जवानांनी आपल्या शौर्य अन् कौशल्याच्या जोरावर दाखविलेल्या शक्तीप्रदर्शनातून सैन्य दिनाच्या पुर्वसंध्येला ‘हम जो टकरायेगा, मिट्टी में मिल जायेंगा’ असा संदेशच जणू अप्रत्यक्षपणे शत्रूंना दिला.


नाशिकच्या देवळाली स्कूल आॅफ आर्टिलरी केंद्रातून भारतीय जवानांना तोफा चालविण्याचे प्रशिक्षण देत उत्कृष्ट कुशल असे ‘गनर’ बनविले जाते. सैन्याचा पाठीचा कणा व युध्दात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या सशक्त अशा भारतीय तोफखान्याकडून होणारा विकसीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बघून शत्रू देशावर वक्रदृष्टी करण्याअगोदर कितीतरीवेळा विचार करेल, हेच या प्रात्याक्षिकांमधून अधोरेखित झाले.

अवघ्या काही सेकंदात एकापेक्षा अधिक बॉम्ब लक्ष्यावर अचूक डागण्याची क्षमता असलेल्या १३०एमएम, १०५ एम.एम., उखळी मारा करणारी हलकी तोफ, कारगिल युद्धात शत्रूला सळो की पळो करून सोडणारी १५५ एम.एम. बोफोर्स, १३० एम.एम. सोल्टम, होवित्झर एम-७७७ आणि के-९ वज्र या अत्याधुनिक तोफांसह मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरच्या सहाय्याने प्रशिक्षित जवानांनी दिलेले लक्ष्य निर्धारित मिनिटांत अचूकपणे भेदले. शौर्य, कौशल्य, देशप्रेमाच्या जोरावर तोफखान्याच्या सैनिकांनी युध्द सराव प्रात्याक्षिकाद्वारे ‘हम भी किसी से कम नहीं’ असा संदेश शत्रूला दिला.
होवित्झर, बोफोर्स तोफांनी दागलेले बॉम्बगोळे आणि वज्रकडून तितक्याच ताकदीने झालेला बॉम्बहल्ला शत्रू राष्टÑांच्या मनात धडकी भरविणारा होता. कारगिलच्या युद्धात पाकिस्तानच्या सैन्याला धूळ चारण्यास यशस्वी ठरलेल्या सहा बोफोर्स तोफांनी एकत्रितपणे प्रत्येकी दोन बॉम्बगोळे लक्ष्याच्या दिशेने दागत उद्ध्वस्त केले. या युद्धजन्य प्रात्यक्षिकांद्वारे तोफखान्याच्या जवानांनी स्वत:ला पुन्हा सिद्ध करत संभाव्य काळात कोणत्याही युद्धाशी मुकाबला करण्यास आधुनिक तोफांसह आम्ही सज्ज असल्याचे अप्रत्यक्षपणे दाखवून दिले.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अति विशिष्ट सेवा मेडल विजेते लेफ्टनंट जनरल दिपींदर सिंह अहुजा यांच्यासह तोफखाना केंद्राचे कमान्डंट लेफ्टनंट जनरल रणबिरसिंग सलारिया यांच्यासह भारतीय वायुसेना, नौसेना, भुदलाचे अधिकारी जवानांसह प्रशासकीय सेवेतील अधिकारी उपस्थित होते. तसेच अमेरिका, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, केनिया, बांग्लादेश, नेपाळ, भुतान, युगांडा, अफगाणिस्तान, ओमान, सौदी अरेबिया आदि देशांमधील भुदल, नौदल, वायूदलाचे जवानांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

लढाऊ हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती
या सोहळ्यादरम्यान युद्धभूमीवर जशी तोफांची भूमिका महत्त्वाची ठरते तसे लढाऊ हेलिकॉप्टरची भूमिकाही तितकीच आवश्यक असते, याचे प्रात्यक्षिकदेखील आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या वैमानिकांनी सादर केले. चेतक, ध्रुव, रुद्र या लढाऊ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जवानांनी चित्तथरारक कसरती सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फेडली. १० हजार फूट उंचीवरून पॅराशूटद्वारे युध्दभूमीवर सैनिकांची दाखल होण्याचे कसबही यावेळी सादर केले.

Web Title: Hum se who will collide ..., Canals 'strike' at Deolali's fire range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.