Fighting between two traditional families | दोन पारंपरिक घराण्यांमध्येच रंगणार लढत

दोन पारंपरिक घराण्यांमध्येच रंगणार लढत

ठळक मुद्देनिफाड: निवडणूक राग-रंगप्रभावी नेत्यांचा अभाव : महायुतीला रोखण्याचे आघाडीसमोर आव्हान

सुदर्शन सारडा
प्रत्येक निवडणुकीत सुरुवातीला तिरंगी-चौरंगी वाटणारी निवडणूक शेवटी दुरंगीच होत असल्याने यंदाही निफाडमध्ये दोन पारंपरिक घराण्यांमधील वातावरण कमालीचे ढवळून निघाले आहे.
२०१४ मध्ये युती तुटल्यामुळे मोदी लाटेतदेखील शिवसेनेचा अबाधित राहिलेला बालेकिल्ला यंदा युती म्हणून लढवला जात असून, त्याला राष्ट्रवादी काँगे्रस आघाडी व बहुजन विकास आघाडीचे आव्हान देण्याचे विरोधकांचे मनसुबे कितपत यशस्वी होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्टÑाचा कॅलिफोर्निया म्हणून निफाडची जशी ओळख आहे, तशीच येथील राजकारणाचीदेखील वेगळी ओळख आहे. विरोधकांच्या घरी पुरणपोळी खाण्याचे भाग्य केवळ निफाड तालुक्यातच मिळते. होऊ घातलेल्या निफाड विधानसभेच्या निवडणुकीत एकूण सहा उमेदवार रिंगणात असून, त्यात पाच अधिकृत पक्षांचे, तर एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. खरी लढत पारंपरिक घराण्यात होईल हे निर्भेळ सत्य असले तरी, कदम विरुद्ध बनकर हा अंतिम सामना रंगेल असे चित्र आहे.
आमदार अनिल कदम हे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत, तर माजी आमदार दिलीप बनकर हे पाचव्यांदा नशीब आजमावत आहेत. अनिल कदम यांनी मागील दोन्ही निवडणुकांत विजय मिळवत राजकारणातील आपला दबदबा कायम ठेवला आहे, तर बनकरांना केवळ एकदा आमदारकी लाभलेली आहे. दुसरीकडे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अपक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम हेदेखील नशीब आजमावत आहेत. आमदार अनिल कदम यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहे. दुसरीकडे सर्वाधिक उलाढाल असलेल्या बाजार समितीचे सभापती म्हणून दिलीप बनकर यांची ओळख गेल्या दोन दशकांपासून आहे. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य तर मागील वर्षी त्यांच्या पुतण्याने पिंपळगाव ग्रामपंचायतमध्ये काबीज केलेली सत्ता ही त्यांची जमेची बाजू आहे. निर्णायक असलेल्या गोदाकाठ भागात आघाडीकडे प्रभावी नेता शिल्लक नसल्याचे चित्र आहे.
मतदारसंघातील
कळीचे मुद्दे
अनेक अडचणींचा सामना करणाºया निसाका, रासाकाची चाके कधी फिरणार?
४द्राक्ष उत्पादन पाहता तालुक्यात द्राक्ष संशोधन केंद्र होणे गरजेचे.
४होऊ घातलेला ड्रायपोर्ट प्रकल्प अनेक अडचणींच्या जाळ्यात अडकला आहे, तो पूर्ण कधी होणार?
हॅट्ट्रिक पराभवाची की विजयाची ?
निफाड मतदारसंघातील लढत तिरंगी वाटत असली तरी, ती शेवटच्या टप्प्यात दुहेरी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रश्न आहे तो हॅट्ट्रिक रोखण्याचा. या निवडणुकीत आमदार अनिल कदम विजयाची हॅट्ट्रिक करून दिलीप बनकरांची पराभवाची हॅट्ट्रिक पूर्ण करणार, की बनकर कदम यांची विजयाची हॅट्ट्रिक रोखून पराभवाची हॅट्ट्रिक खंडित करतात, याकडे तालुक्यातील जाणकारांचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन निवडणुकांपासून निफाड मतदारसंघात बनकर विरुद्ध कदम असा सामना रंगत आहे. यावेळीही त्यांच्यातच चुरस आहे.
बदललेली समीकरणे
निफाड तालुक्यातही गेल्या महिनाभरात पक्षांतराचे वातावरण होते. त्यामुळे आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती. यंदा विरोधकांकडून प्रस्थापितांविरुद्ध नकारात्मक भावनेचा प्रचार केला जात आहे.
सात जिल्हा परिषद गटांत शिवसेना-राष्ट्रवादी तीन ठिकाणी समान आहे, तर एक अपक्ष आहे. पंचायत समितीत सेनेची सत्ता आहे. निफाड नगरपंचायतमध्येदेखील तीन नगरसेवकांनी केलेल्या पक्षांतरामुळे तेथे राष्ट्रवादी शून्यावर आली आहे.
संपूर्ण भारतात निर्यातक्षम द्राक्ष शेतीसाठी प्रसिद्ध असलेला निफाड तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. पूर्वी मोगल आणि कर्मवीर गटात सत्ता संघर्ष होता, तो आता कदम आणि बनकर गटात दिसून येत आहे.

Web Title: Fighting between two traditional families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.