मुखेड महावितरण कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळे ठोकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 22:30 IST2021-12-20T22:30:16+5:302021-12-20T22:30:16+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड येथील महावितरणने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप करत सोमवारी (दि. २०) संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले.

मुखेड महावितरण कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळे ठोकले
मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड येथील महावितरणने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप करत सोमवारी (दि. २०) संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले.
सध्या येवला तालुक्यातील मुखेड परिसरात कांद्याची लागवड सुरू असताना महावितरण कोणतीही पूर्वसूचना न देता वीज तोडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, जे शेतकरी बिल भरण्यास तयार आहेत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू नका, अशी विनंती करूनही अधिकाऱ्यांनी ७० टक्के वसुली झाल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत करण्यास नकार दिल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले.
यावेळी मुखेड महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अमोल राजोळे यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, सध्याच्या परिस्थितीत मुखेड येथील ४ आणि दत्तवाडी येथील २ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला होता. मात्र शेतकऱ्यांच्या विनंतीवरून हा खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करणार आहे. थकीत बिल बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी कृषी वीज बिल सवलत योजनेत सहभागी होऊन थकीत असलेल्या रकमेत ६६ टक्के सवलत मिळणार आहे. याप्रसंगी शिवसेनेचे नेते छगन आहेर, पवन आहेर, सुरेश वाघ, विठ्ठल कांगणे, विनायक आहेर, प्रल्हाद कदम, अशोक शेळके, ज्ञानेश्वर शिवपुरे, भास्कर आहेर, सुनील आहेर, किशोर आहेर आदी शेतकरी उपस्थित होते.