Counting of votes for sixteen hours! | तब्बल सोळा तास चालली मतमोजणी !

तब्बल सोळा तास चालली मतमोजणी !

नाशिक : मतमोजणीसाठी तब्बल अकराशे कर्मचारी व सहायक, त्यांना सहाय्य करण्यासाठी नऊशे सहकारी व पडद्याआड झटणारे तितकेच हातांनी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी निर्धारित वेळेत पूर्ण केली. नाशिक मतदारसंघाची मोजणी रात्री अडीच वाजता, तर दिंडोरी मतदारसंघाने साडेदहा वाजता पूर्ण करून विजयी उमेदवारांच्या हाती प्रमाणपत्र बहाल केल्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रकियाच शांततेत व निर्विघ्न पार पडल्याबद्दल सुटकेचा श्वास सोडला.
२९ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर जिल्ह्यातील मतदान यंत्रे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून थेट अंबडच्या सेंट्रल वेअर हाऊसच्या स्ट्रॉँगरूममध्ये ठेवण्यापर्यंत राबलेल्या निवडणूक यंत्रणेला त्यानंतरही चोख काळजी घ्यावी लागली. देशभरातून ईव्हीएम यंत्रे हॅक व चोरीला जाण्याच्या घटनांच्या वृत्ताने वेअर हाउसची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले, यंदा पहिल्यांदाच उमेदवारांनी निवडणूक यंत्रणेवर अविश्वास प्रकट करीत वेअर हाउसच्या बाहेर स्वत:ची खासगी सुरक्षा व्यवस्था ठेवली. निवडणूक पूर्व एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर व्यक्त होणारी मते-मतांतरे व त्यातून निर्माण झालेला राजकीय तणाव पाहता, प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी त्याचे काय पडसाद उमटतील याची चिंता निवडणूक यंत्रणा व पोलीस खात्यालाही भेडसावली. अशा परिस्थितीत गुरुवारी सकाळी ८ वाजता नाशिक व दिंडोरी मतदारसंघाची मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यास सुरुवात झाली, परंतु तिथे निवडणूक आयोगाच्या सर्व्हरमध्येच तांत्रिक बिघाड झाल्याने अधिकारी व मोजणी करणारे कर्मचारीही घाबरले. एकीकडे निवडणूक आयोगाकडून सातत्याने होणारी विचारणा व त्यात निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे साधारणत: दोन तासानंतर प्रयत्न थांबविण्यात आले. याच दरम्यान, निवडणूक निरीक्षक, उमेदवारांचे प्रतिनिधीसमक्ष मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्रॉँग रूमचे सील काढण्यात येऊन मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.
पोस्टल मतपत्रिकेतही पवार, गोडसेंना पसंती
सकाळी ८ वाजेपर्यंत नाशिक मतदारसंघासाठी ३५३९ पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाल्या होत्या, त्यांची मोजणी सकाळी ८ वाजेपासून सुरू करण्यात आली. परंतु आयोगाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतमोजणी थांबविण्यात आली होती, दुपारनंतर नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात येऊन मोजणी करण्यात आली. त्याचा निकाल मात्र तब्बल १२ तासाने जाहीर झाला, त्यात गोडसे यांना १५६४, तर भुजबळ यांना ५४१ मते मिळाली. पवन पवार यांना १४५, तर कोकाटे यांना २९८ मते मिळाली. या मोजनीत ८६० मते अवैध ठरली. दिंडोरी मतदारसंघासाठी पोस्टल मतपत्रिका २९७० प्राप्त झाल्या होत्या. त्याची मोजणी सकाळी सुरू करण्यात आली असली तरी निकाल मात्र रात्री पावणेनऊ वाजता जाहीर करण्यात आला. त्यात भारती पवार यांना २०१८, धनराज महाले यांना ५८० व गावित यांना ८५ मते मिळाली. १८ मतदारांनी नोटाचा वापर केला, तर ९३ मते अवैध ठरली.

Web Title:  Counting of votes for sixteen hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.