आंबाबारी व भोयऱ्यातील प्रकल्पग्रस्तांच्या घरात शिरले पाणी; गोठाही कोसळला
By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: September 16, 2023 17:45 IST2023-09-16T17:44:51+5:302023-09-16T17:45:28+5:30
शुक्रवार व शनिवारी झालेल्या पावसामुळे या काॅलनीत पाणी साचले.

आंबाबारी व भोयऱ्यातील प्रकल्पग्रस्तांच्या घरात शिरले पाणी; गोठाही कोसळला
रमाकांत पाटील/नंदुरबार
नंदुरबार : गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने देहली प्रकल्पग्रस्तांच्या आंबाबारी पुनर्वसन व भोयरा फाटा कॉलनीत पावसाचे पाणी निघण्यासाठी गटारे नसल्याने अनेक घरात पाणी शिरले. गुरांचा गोठा असलेले घर कोसळले. दरम्यान, ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील देहली प्रकल्पग्रस्तांसाठी अंबाबारी व भोयरा फाटा येथे वसाहती तयार करण्यात आल्या. मात्र, याठिकाणी सुविधांअभावी प्रकल्पग्रस्तांची गैरसोय होऊन हाल होत आहेत.
शुक्रवार व शनिवारी झालेल्या पावसामुळे या काॅलनीत पाणी साचले. पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारींची सोय केलेली नसल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. प्रेमदास काशिराम तडवी यांचे गुरांसाठी असलेले कौलारू घर कोसळले. तर भोयरा फाटा येथील कांतीलाल मोहन तडवी, चिमन गोविंद तडवी, हरसन छगन तडवी, अरविंद जामसिग तडवी, हरिश्चंन्द्र सुरेश तडवी, श्रावण कांतीलाल तडवी, अंबाबारी पुनर्वसन येथील शामा खात्र्या तडवी, नरेश देवीदास तडवी, गंगाराम देवीदास तडवी यांच्या घरात पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्य पाण्यात तरंगत होते. जीवनावश्यक वस्तूंचे ही नुकसान झाल्याने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी या नुकसानग्रस्तांनी केली आहे.