शेअर बाजाराला भुलला आणि ६७ लाख गमावून बसला
By मनोज शेलार | Updated: June 13, 2024 18:01 IST2024-06-13T18:00:46+5:302024-06-13T18:01:04+5:30
जानेवारी ते जून २०२४ या दरम्यान ही फसवणूक करण्यात आली.

शेअर बाजाराला भुलला आणि ६७ लाख गमावून बसला
मनोज शेलार/नंदुरबार : शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉटस्ॲप ग्रुपद्वारे गुंतवणुकीचे आमिष दाखवत खापर, ता. अक्कलकुवा येथील हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६७ लाख एक हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत अक्कलकुवा पोलिसात संबंधित ग्रुप चालविणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी ते जून २०२४ या दरम्यान ही फसवणूक करण्यात आली.
नासीर लुकमन खान (५६), रा. खापर असे हॉटेल व्यावसायिकांचे नाव आहे. खान हे विनटॉन स्टॉक पुलिंग ग्रुप, केकेआरसीएस स्टॉक हे व्हॉट्सॲप ग्रुप व अरिहंत कॅपिटल कस्टमर केअर क्रमांक यांनी खान यांना वेळोवेळी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले. त्यासाठी ग्रुप ॲडमिनच्या खात्यावर पैसे पाठविण्यास सांगण्यात आले. सहा महिन्यात तब्बल ६७ लाख एक हजार रुपये त्यांनी पाठविले; परंतु यातून आपला काहीच फायदा होत नाही, उलट नुकसान होत असल्याचे लक्षात आल्यावर १२ जून रोजी नासीर खान यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन्ही व्हॉटस्ॲप ग्रुप ॲडमिन श्रीलया अकेला व अनुराग ठाकूर आणि अरिहंत कॅपिटल कस्टमर केअरचे रोनक बिलाला यांच्याविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहेत.