मुलीचे नाव घेतो म्हणून अल्पवयीन बालकास पळवून नेत डांबले
By मनोज शेलार | Updated: March 31, 2023 19:45 IST2023-03-31T19:45:31+5:302023-03-31T19:45:38+5:30
याप्रकरणी चार जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीचे नाव घेतो म्हणून अल्पवयीन बालकास पळवून नेत डांबले
नंदुरबार : सतरा वर्षीय बालकास पळवून नेत घरात डांबले व बळजबरीने मुलीला त्रास देणार नाही, असे लिहून घेतल्याचा प्रकार नंदुरबारातील कोकणी हिल भागात घडला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनगर पोलिस ठाण्याच्या मागील भागात राहणारे वैद्यकीय अधिकारी यांच्या १७ वर्षीय मुलास कोकणी हिल, दुधाळे शिवारातील नितीन सोनार व इतर तिघांनी पळवून नेल्याचा आरोप संबधित डॉक्टरांनी केला. सोनार यांच्या घरात नेऊन मुलास डांबून ठेवले. हाताबुक्क्यांनी मारहाण करून जबरदस्तीने कागदावर यापुढे मुलीला त्रास दिल्यास वडील जबाबदार राहतील, असे लिहून घेतले.
याशिवाय डाॅक्टर यांच्या पत्नी यांनादेखील धक्काबुक्की करून अश्लील शिवीगाळ केली. मोबाइल जबरदस्तीने हिसकवून घेतला. याबाबत डॉक्टरांनी फिर्याद दिल्याने नितीन सोनार (४०), विशाल सोनार (३०) व इतर दोघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरिक्षक नंदा पाटील या करत आहेत.