सुरत-अयोध्या एक्सप्रेसवर दगडफेक; मानिसक रुग्णासह एकजण ताब्यात
By मनोज शेलार | Updated: February 12, 2024 13:10 IST2024-02-12T13:07:04+5:302024-02-12T13:10:15+5:30
पोलिस सूत्रांनुसार, सुरत स्थानकावरून रविवारी रात्री आठ वाजता आयोध्या येथे जाण्यासाठी आस्था एक्सप्रेस रवाना झाली

सुरत-अयोध्या एक्सप्रेसवर दगडफेक; मानिसक रुग्णासह एकजण ताब्यात
मनोज शेलार/नंदुरबार
नंदुरबार : सुरतहून आयोध्याकडे जाणाऱ्या आस्था रेल्वे एक्सप्रेसवर नंदुरबारनजीक दगडफेक झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. रेल्वे पोलिस आणि नंदुरबार शहर पोलिसांनी शोध मोहिम राबविल्यावर दोनजणांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी एकजण मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिस सूत्रांनुसार, सुरत स्थानकावरून रविवारी रात्री आठ वाजता आयोध्या येथे जाण्यासाठी आस्था एक्सप्रेस रवाना झाली. एक्सप्रेस रविवारी रात्री ११ वाजता नंदुरबारपासून एक किलोमिटर अंतरावर आली असता रेल्वेच्या एका डब्यावर काही दगड आदळले. यामुळे प्रवासी भयभीत झाले. नंदुरबार स्थानकावर रेल्वे आली असता ही बाब रेल्वे पोलिसांना सांगण्यात आली. लागलीच रेल्वे पोलिस, नंदुरबार शहर, उपनगरचे पोलिस घटनास्थळाकडे रवाना झाले. त्या भागात शोधमोहिम हाती घेतली असता झाडांमध्ये दोन जण लपलेले आढळले. रेल्वे पोलिस त्याच्याजवळ गेले असता पोलिसांवरही त्यांनी दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता दोघांपैकी एकजण मानिसक रुग्ण असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याबाबत रेल्वे पोलिसात रेल्वे कायदा १५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार रेल्वेमध्ये एकुण १,३४० प्रवासी होते.